मृत कोरोना योद्धयांच्या वारसांना डॉक्टरकीची संधी

मृत कोरोना योद्धयांच्या वारसांना डॉक्टरकीची संधी

कोरोनाचा सामना करताना मृत्यूमुखी पडलेल्या योद्धयांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५० लाखांचा विमा उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर आता मृत्यूमुखी पडलेल्या कोरोना योद्ध्यांच्या वारसांना देशभरातून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पाच जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. या जागा नवी दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

कोरोना काळामध्ये रुग्णांना वाचवण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या कोरोना योद्ध्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. यासंदर्भात क्लिनिकमध्ये काम करणारे डॉक्टर व नर्स यांना यातून वगळण्यात आले असल्याने वैद्यकीय क्षेत्रामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना योद्ध्यांनी देशासाठी दिलेल्या समर्पणाची दखल घेत त्यांच्या वारसांना एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये पाच जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डायरक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसच्या मेडिकल कौन्सिलिंग समितीने घेतला आहे. या पाच जागा नवी दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडमधील कॉलेजमध्ये राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍या कोरोना योद्धयाच्या वारसाने नीट परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच विद्यार्थ्यांना राखीव जागांवर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि आरोग्य सेवा संचालनालयामार्फत अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. राखवी जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना डायरक्टोरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसने दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करायचा आहे, यासंदर्भात मेडिकल कौन्सिलिंग समितीने परिपत्रक जाहीर केले आहे.

पाच जागा राखीव ठेवताना मेडिकल कौन्सिलिंग समितीने जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष कोविड रुग्णांशी संबंध आला, अशा आरोग्य सेविका, खासगी रुग्णालयातील कर्मचारी, तसेच राज्य व केंद्र सरकारचे रुग्णालय, खासगी आणि स्वायत्त रुग्णालयातील निवृत्त, स्वेच्छेने पुढाकार घेतलेले, स्थानिक नागरी संस्था, कंत्रादी पद्धतीचे कर्मचारी, आऊटसोर्स केलेले कर्मचारी, एम्स आणि आयएनआय हॉस्पिटलमधील कर्मचारी, त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कोविड १९ शी निश्चित केलेले कर्मचारी यांना कोरोना योद्धे म्हणून ग्राह्य धरले आहे.

या कॉलेजांमध्ये आहेत राखीव जागा

First Published on: December 7, 2020 5:39 PM
Exit mobile version