डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचंही होणार ऑडिट

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचंही होणार ऑडिट

अनकेदा डॉक्टरांद्वारे रुग्णांना गरज नसतानाही अँटिबायोटिक गोळ्या लिहून दिल्या जातात. अँटिबायोटिक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. याच पार्श्वभूमीवर, राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने डीएचएस अंतर्गत येणाऱ्या सरकारी आणि जिल्हा हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आता त्यांनी रुग्णांना दिलेल्या प्रिस्क्रिप्शनची प्रत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दर आठवड्याला अधिकाऱ्यांमार्फत त्याबाबतचं ऑडिट केलं जाणार आहे.

सध्या बऱ्याच अशा अँटीबायोटिक्स आहेत जी अनेकदा रोगांवर गुणकारी ठरत नाही. याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे अनेकदा गरज नसतानाही रुग्णांना अँटिबायोटिक्स दिल्या जातात. बऱ्याचदा रुग्ण आजारावर अर्धवट उपचार करुन सोडून देतात. त्यामुळे, शरीरातील विषाणू त्या औषधांवरील मार्ग शोधून काढतात आणि आणखी ताकदवान होतात. ज्यानंतर त्या रुग्णांच्या आजारांवर अँटिबायोटिक्स प्रभावी ठरत नाही. यावरच अंकुश ठेवत आणि तोडगा काढण्यासाठी आरोग्य सेवा संचालनालयाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

आठवड्याला जिल्हा अधिकाऱ्यांकडून ऑडिट

सर्व सरकारी आणि जिल्हा हॉस्पिटलना सुचना देण्यात आल्या आहेत की, ओपीडीत येणाऱ्या रुग्णांच्या केसपेपरमध्ये योग्य पद्धतीने माहिती भरणं गरजेचं आहे. गोळ्यांची नावं योग्य पद्धतीने लिहिली गेली पाहिजे जेणेकरुन ते वाचताना सोपं होईल. जेनेरिक औषधांचीच नावं लिहावीत, गरज असेल तरच अँटिबायोटिक लिहून द्यावी. सर्व गाईडलाईन्सचं पाळण केलं पाहिजे. डॉक्टरांना रुग्णांना गोळ्या लिहून दिल्या कि त्या प्रिस्क्रिप्शनची एक झेरॉक्स कॉपी स्वत: कडे ठेवावं लागेल. ज्याचं ऑडिट दर आठवड्यात जिल्हा अधिकाऱ्यांकडून केलं जाणार आहे.

ऑडिट करून अहवाल सरकारला देणं बंधनकारक

तसंच, सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एका संस्थेतील प्रिस्किप्शनचं ऑडिट करून याचा अहवाल सरकारला सादर करणं बंधनकारक असणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हॉस्पिटलमधील जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र पाठवण्यात आलं आहे , असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.

जन आरोग्य चळवळीच्या कार्यकर्त्यांची भूमिका

अँटिबायोटिक्स औषधं बाजारात सहज उपलब्ध होतात. मात्र अनेक शहरात डॉक्टांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधं दिली जात नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा रुग्ण डॉक्टरांची जुनी चिठ्ठी दाखवून औषधं घेतात. यावर ही उपाययोजना केल्या पाहिजेत अशी भूमिका जन आरोग्य चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आली आहे.

First Published on: October 12, 2019 4:22 PM
Exit mobile version