रखडलेल्या विद्या वेतनासाठी डॉक्टर्स एकवटणार; दिला कामबंद आंदोलनाचा इशारा

रखडलेल्या विद्या वेतनासाठी डॉक्टर्स एकवटणार; दिला कामबंद आंदोलनाचा इशारा

आंदोलन

राज्य सरकारच्या महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. विद्यावेतन वाढ आणि काही रुग्णालयांमध्ये स्टायपेंड मिळत नसल्यामुळे डॉक्टर नाराजी व्यक्त करत आहेत. शिवाय, ठोस आश्वासन देऊनही मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. राज्यातील हजारांपेक्षा जास्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांचा गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. याच्याच निषेधार्थ लातूर, आंबेजोगाई, नागपूर आणि लातूर या सरकारी मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे.

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने राज्य सरकारला पत्र लिहून होणाऱ्या टोलवाटोलवीचा निषेध केला आहे. शिवाय, मागण्यांना गंभीरतेने घेतलं जावं यासाठी आता राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना सेंट्रल मार्डच्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले की, “नागपूर, अकोला, अंबाजोगाई आणि लातूर या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना मिळणारं स्टायपेंड तीन महिन्यांपासून रखडले आहे. एक हजार निवासी डॉक्टरांचे मानधन डिसेंबर २०१८ पासून मिळालेले नाही. काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उगारलं, संप मागे घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने मानधन देण्याचे आदेश दिले होते. एक कोटी रूपयांची तरतूदही केली. पण हे पैसे महाविद्यालयापर्यंत पोहोचले नाहीत.”

गेल्या ३ महिन्यांपासून निवासी डॉक्टरांना स्टायपेंड मिळाला नाही, हे आम्हाला माहिती आहे. डॉक्टरांची एमएस, एमडी पदं वाढली आहेत. त्यामुळे त्यांच्या मानधनवाढीच्या तरतुदीबाबत बजेट यावेळी सादर झालेलं नाही. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन आणि मानधनवाढीचा प्रश्न एप्रिललाच सोडवण्यात येणार आहे. तर, कायमस्वरुपी प्रश्न सोडवण्यासाठी जूनमध्ये प्रयत्न करण्यात येणार आहे.
– डॉ. तात्याराव लहाने, संचालक, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डिएमईआर)

“यासंदर्भात पाठपुरावा केला असता सरकार आचारसंहितेचं कारण पुढे केलं जात आहे. पण, आता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. या भेटीत मानधन वाढ आणि रखडलेलं मानधन देण्याची विनंती करणार आहोत. ही विनंती मान्य न झाल्यास राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर जातील”, असा इशाराही डोंगरे यांनी दिला आहे.

First Published on: March 28, 2019 8:14 PM
Exit mobile version