अपमानास्पद वागणुकीला कंटाळून सूनेने केली सासूची हत्या

अपमानास्पद वागणुकीला कंटाळून सूनेने केली सासूची हत्या

प्रातिनिधिक फोटो

वडाळा येथे एका ६५ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना घडली. सूनेनेच सासूची हत्या केली असल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. साखराबाई कडू गिरे असे या मृत महिलेचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी सून सुरखा विठ्ठल गिरे (३५ वर्ष) हिला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर सुरेखाला लोकल कोर्टामध्ये हजर केले असता कोर्टाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सतत होत होते भांडण

सासूकडून सतत होणार्‍या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून तिने ही हत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी सांगितले. ही घटना रविवारी दुपारी वडाळा येथील मिठागर झोपडपट्टीतील गिरीधन तांबे नगरात घडली. या परिसरातील मृत महिला साखराबाई ही तिचा मुलगा विठ्ठल, सून सुरेखा, नातू आणि नात सूनेसोबत राहत होती. विठ्ठल हा माटुंगा परिसरात चालक म्हणून कामाला होता. काही दिवसांपासून सुरेखा आणि साखराबाई यांच्यात नेहमीच खटके उडत होते. रविवारी सुरेखाचा पती नेहमीप्रमाणे कामाला निघून गेला.

अशी घडली घटना

दरम्यान, दुपारी बारा वाजता तिचे सासू साखराबाईशी घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर तिने तिला धक्काबुक्की करुन मारहाण केली होती. त्यात भिंतीवर डोक आदळून साखराबाई या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिथे डॉक्टरांनी साखराबाईला मृत घोषित केले. पोलीस तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस होताच आरोपी सून सुरेखा गिरेविरुद्ध वडाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच तिला बुधवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर केले असता तिला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

First Published on: June 20, 2019 8:38 PM
Exit mobile version