डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आता नव्या जबाबदारीची शक्यता

डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर आता नव्या जबाबदारीची शक्यता

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत अभिनेते अमोल कोल्हे खासदार झाले. मात्र आता या खासदार झालेल्या अमोल कोल्हे यांच्यावर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता असून, त्यांच्यावर मुंबईचे प्रभारी पद सोपवले जाऊ शकते. अशी माहिती मिळत असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या याची जोरदार चर्चा आहे. मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे.

म्हणून युवक कार्यकर्त्यांची अमोल कोल्हे यांना पसंती 

सध्या मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारसी ताकद उरली नसून, जर अमोल कोल्हे यांच्यावर जबाबदारी सोपवली तर त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो. तसेच आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता मुंबई सारख्या शहरी भागात देखील पक्षाची ताकद वाढणे गरजेचे आहे. एवढंच नाही तर सध्या अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे अमोल कोल्हे घराघरात पोहोचल्याने त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असे काही युवक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे त्यांच्यावर मुंबईच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी खुद्द शरद पवार यांनी देखील शहरी भागात देखील पक्षाचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे म्हंटले होते.

अमोल कोल्हे राज यांच्या भेटीला 

विशेष बाब म्हणजे बुधवारी अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनी ही भेट फक्त सदिच्छा भेट असल्याचे सांगितले होते. मात्र राज ठाकरे यांचा शहरी भागात प्रभाव असून, विधानसभा निवडणुकीत जर मनसे राष्ट्रवादी सोबत गेल्यास याचा फायदा होऊ शकतो अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. त्यामुळेच अमोल कोल्हे यांनी घेतलेली राज यांची भेट बरंच काही सांगून जातं असे म्हणायला हरकत नाही.

First Published on: June 13, 2019 2:55 PM
Exit mobile version