टाटा मिल कंपाऊंड की गटाराच्या पाण्याचं तळं!

टाटा मिल कंपाऊंड की गटाराच्या पाण्याचं तळं!

घरामध्ये पाणी शिरल्याने रहिवासी त्रस्त

घरामध्ये गुडघाभर साचलेलं पाणी आणि त्यामध्ये हतबल होऊन बसलेल्या आजीबाई…, ही परिस्थिती आहे मुंबईतील परळच्या टाटा मिल कंपाऊंडमधील रहिवाशांची. हे धक्कादायक दृश्य पाहून कोणालाही या स्थितीत नेमकं राहायचं कसं? हा प्रश्न सतावेल. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील रहिवाशांवर अशा बिकट परिस्थिती राहण्याची वेळ आली आहे. खरंतर पावसाने त्यांची ही अवस्था केली नसून पाण्याचा निचरा न झाल्याने येथील नागरिकांना पाण्यामध्ये रहावे लागत आहे. पावसाच्या संततधारेमुळे तळघरात राहणाऱ्यांच्या घरामध्ये पाणी साचत असून बाजूने वाहणाऱ्या नाले, गटाराचे पाणीही त्यांच्या घरामध्ये शिरत आहे. या घाण पाण्यासोबतच त्यातील कचरा, झुरळं, सांडपाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने येथील रहिवासी पुरते हैराण झाले आहेत.

हेची झाले नित्याचेच

परळ स्टेशनला लागूनच ११६ वर्ष जुनी टाटा मिल कंपाऊंडची चाळं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या चाळीत गिरणी कामगार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मात्र ही चाळ सखल भागात असल्यामुळे येथील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात त्रासाचा सामना करावा लागत आहे. तब्बल १५३ घरं असलेल्या या चाळीत १२०० हून अधिक लोकं राहतात. त्यामध्ये १०० हून जास्त वयोवृद्ध रहिवासी राहतात. मात्र तरीही या चाळीचा विकास करण्याची तसदी ना येथील स्थानिक आमदारांनी घेतली ना प्रशासनाने.

लोकप्रतिनिधींची पोकळ आश्वासनं 

या परिसरातील लोकप्रतिनिधी केवळ निवडणूका जवळ आल्या की येथील रहिवाशांना तुमच्या चाळीचा विकास करू, असे आश्वासन देतात. मात्र निवडणुका संपल्या की पुन्हा परिस्थिती जैसे थे असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. त्यामुळे या रहिवाशांचा प्रश्न नेमका कधी सुटणार, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

First Published on: July 10, 2018 6:21 PM
Exit mobile version