केटामिनचे उत्पादन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त

केटामिनचे उत्पादन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त

प्रातिनिधिक फोटो

महसूल गुप्तचर संचालनालयने (डिआरआय) केटामिनचे उत्पादन करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या तपासणी दरम्यान पोलिसांनी २७ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. जोगेश्वरी, पनवेल, भिवंडी, गोवा अशा ठिकाणांवरुन जप्ती केली गेली. युनायटेड किंग्डम मधील एक राष्ट्रीय संघटना आणि भारतातील केमिस्ट्री विषयाचा टॉपर राहुल शेडगे हे या गोरखधंद्याचे सुत्रधार असल्याचे तपासातून समोर आले आहे.

जेलमधून सुटल्यानंतरही गैरकार्य सुरुच

राहुल शेडगेला याआधीही अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985) २००९ आणि २०१२ मध्ये अटक करण्यात आले होते. परंतु, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा अमली पदार्थ उत्पादनाचा व्यवसाय सुरु ठेवला. रासायनिक कारखान्याच्या नावाखाली पनवेलच्या रसायनी भागातील एका कारखान्यात राहुल केटामिनचे उत्पादन करायचा.

तस्करीचे रॅकेट

डिआरआयच्या मुंबई विभागाने जोगेश्वरीमधील ओबेरॉय स्प्लेंडर या इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकून केटामिन तस्करीचे रॅकेटही उघड केले आहे. फ्लॅटवर डिआरआयला ३५ किलोग्रॅमची तपकिरी रंगाची पावडर मिळाली. लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर त्यात केटामिनचे घटक मोठ्या प्रमाणात आढळले. याप्रकरणी जालंदरचा रहिवासी अक्षरेंद्र सिंग सोढी याला अटक केली आहे. याच फ्लॅटमधून सोढी अंधेरी आणि ओशिवारा विभागात ड्रग्जची तस्करी करत होता.

अधिकाऱ्यांना मिळाले कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ

डिआरआयच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आम्ही पनवेलच्या रसायनीमधील जय विजय इंडस्ट्रीज या रासायनिक कारखान्यावर छापा टाकाला. त्याचबरोबर युकेच्या अॅन्थनी पॉल आणि शेडगे यांनाही अटक केले आहे.” गोव्यातही ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका टोळीला गजाआड करण्यात आले आहे. या पुर्ण कारवाईत डिआरआयने एकंदरीत २७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.

First Published on: June 13, 2018 4:58 PM
Exit mobile version