नवी मुंबईत पाण्याचे पहिले एटीएम सुरू

नवी मुंबईत पाण्याचे पहिले एटीएम सुरू

वॉटर एटीएम

विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी तुर्भे विभागात पाण्याचे एटीएम सुरू करण्यात आले आहे. पालिका आणि बीएएसएफ कंपनीने एकत्रितपणे ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. तुर्भेतील झोपडपट्टी भागातील शाळा क्रमांक २२ मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला असून त्यातून येथील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. तर रहिवाशांना अल्प दरात पेयजल मिळवता येणार आहे. या प्रकल्पासाठी पावसाळी पाण्याचा वापर करण्यात आला असून सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करून त्या विजेवर हा प्रकल्प चालवला जाणार आहे.

कंपनीने या आधी चेन्नईत हा प्रकल्प राबवला आहे. राज्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच एटीएम आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा देखभाल आणि मनुष्यबळ खर्च निघावा यासाठी आजूबाजूच्या रहिवाशांना येथील पाण्याची विक्री केली जाणार आहे. वीस लिटर शुद्ध पाणी केवळ आठ रुपयांत उपलब्ध करून दिले जाणार आहे. आरोग्याची काळजी आणि पर्यटन यामुळे देशातील पिण्याच्या बाटलीबंद पाण्याचा उद्योग बहरला. पिण्याच्या पाण्याच्या एका बाटलीसाठी दहा रुपये मोजणे आर्थिकदृष्ठ्या दुर्बर्लांना परवडत नाही.

अशुद्ध पाण्यामुळे होणार्‍या आजारांविषयी फारशी माहितीही नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना किमान शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे. यासाठी तुर्भे स्टोअर्स येथील पालिका शाळा क्रमांक २२ च्या आवारात चाळीस चौरस फुटांच्या जागेत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. कंपनीला ही जागा विनामूल्य देण्यात आली आहे. कंपनीने ‘वॉटर लाइफ इंडिया’ या पाण्याचे शुद्धीकरण करणार्‍या कंपनीची मदत घेऊन सुमारे तीस लाख रुपये खर्च करून एक अद्ययावत प्रकल्प उभारला.यासाठी बीएएसएफ कंपनीचे अल्ट्रा फिल्टरेशन तंत्रज्ञान वापण्यात आले. प्रकल्पाला स्टेप या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. कंपनीने या प्रकल्पाला लॅण्डमार्क प्रोजेक्ट असे नाव दिले असून यानंतर नवी मुंबईतील आदिवासी भागांत असा प्रकल्प उभारला जाणार आहे. याच लॅण्डमार्क प्रोजक्ट मार्फत या भागातील सांडपाण्याचे नियोजन देखील केले जाणार आहे. त्यासाठी झोपडपट्टीतील शौचालयांचे नूतनीकरण केले जाणार आहे.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळण्याची सुरुवात इथून होत आहे. या एटीएमला मिळणारा प्रतिसाद पाहता शहरातील प्रत्येक झोपडपट्टी व आदिवासी भागात असे एटीएम निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई पालिका

First Published on: August 5, 2018 8:00 AM
Exit mobile version