भिक्षेकरू आणि गर्दुल्यांमुळे ‘अमर महल’ चे काम वेठीस

भिक्षेकरू आणि गर्दुल्यांमुळे ‘अमर महल’ चे काम वेठीस

अमर महाल ब्रिज

ईस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावर वाहन चालकांसाठी हमखास गैरसोयीचे ठिकाण झालेल्या अमर महाल उड्डाण पुलाचे काम आणखी लांबणार आहे. २० वर्षांपासून आम्ही फ्लायओव्हरखाली राहतो, असा दावा करत आता भिक्षेकरू आणि गर्दुल्यांनी ही जागा अडवून धरली आहे. त्यामुळे जुना फ्लायओव्हर तोडून नवे बांधकाम करण्याचा दुसरा टप्पा रखडला आहे. वारंवार याठिकाणी होणार्‍या चोऱ्यांमुळे कंत्राटदार कंपनीच्या नाकीनऊ आले आहे. दररोज दीड लाख वाहने या अमर महाल पुलाचा वापर वाहतुकीसाठी करतात. सकाळी आणि रात्री जास्त गर्दीच्या वेळेत अमर महाल उड्डाणपूल बंद असल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय अनुभवावी लागते.

ताबा सोडण्यास हे भिक्षेकरू आणि गर्दुले तयार नाहीत

अमर महाल उड्डाणपुलाचा एक भाग जून महिन्यात सुरू करण्यात आला. पण दुसरऱ्या भागातील जुना उड्डाणपूल तोडायचे काम २२ जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. याठिकाणच्या कामाचे कंत्राट स्वीकारलेली एनसीसी कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आतापर्यंत आठ पत्र लिहून हे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. पण पोलिसांनी दोन वेळा प्रयत्न करूनही याठिकाणचा ताबा सोडण्यास हे भिक्षेकरू आणि गर्दुले तयार नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा भाग रिकामा करून देण्याचे आणखी एक आश्वासनही दिले आहे.

उड्डाणपुलाचे पाच टन लोखंड गायब

पहिल्या टप्प्यातील बांधकामात जुना उड्डाणपूल तोडताना तब्बल ५ टन लोखंड या गर्दुल्यांनी लंपास केले. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या या चोरऱ्या झाल्या आहेत. अनेकदा काम सुरू नसतानाच्या वेळेत अनेक जणांनी टोळीने एकत्र येऊन ही चोरी केली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. प्रतिकार करणारऱ्या सुरक्षा रक्षकांनाही याठिकाणी मारहाण झाली आहे. आतापर्यंत चार सिक्युरिटी एजन्सीचे काम बदलूनही चोरीचे प्रकार थांबलेले नाहीत. पोलिस ठाण्यात तक्रार करूनही हे प्रकार थांबत नसल्याची माहिती आहे. कंत्राटदार कंपनीने हा उड्डाणपूल तोडण्यासाठी परदेशातून आणलेले महागडे टूल्सदेखील या कामादरम्यान लंपास झाले आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी दररोज नवनवीन प्रकारांना सामोरं जाव लागत असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

डायव्हर्जन पूर्ववत

गेल्या अनेक महिन्यांपासून अमर महाल उड्डाणपुलाचे पहिल्या टप्प्यातले काम सुरू होते. त्यामुळे या उड्डाणपुलाखालील वाहतूक वळविण्यात आली होती. पण आजपासून पुन्हा एकदा जुन्या मार्गावर ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पावसाळ्यामुळे हे काम लांबणीवर पडल्याची माहिती आहे.

आतापर्यंत दोनवेळा उड्डाणपुलाखालील लोकांना हटविण्याचा प्रयत्न केला होता. पण हे लोक परत त्या ठिकाणी आले आहेत. यांच्याकडून कामात अडथळे आणण्याचे प्रकार झाले आहेत.आता महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची मदत घेऊन मोठे मनुष्यबळ वापरून त्यांना हटविण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.


किरण कारंडे – मुंबई

First Published on: July 5, 2018 9:30 AM
Exit mobile version