मेट्रोमुळे शिवाजी पार्ककडील झाडांना धोका

मेट्रोमुळे शिवाजी पार्ककडील झाडांना धोका

चिखलमिश्रीत पाण्यामुळे पानगळ, झाडे मृतप्राय

सध्या मुंबईत सर्वत्र मेट्रोची कामे सुरू आहेत. त्याप्रमाणे दादर येथेही भुयारी मेट्रो रेल्वेचे काम प्रगतीपथावर आहे. त्यातून बाहेर येणारे चिखलयुक्त प्रदूषित पाणी थेट शिवाजी पार्क येथील रस्त्यावर सोडले जाते, हे पाणी थेट पदपथाच्या बाजूला असलेल्या झाडांच्या मुळाशी झिरपत आहे. त्याचा परिणाम म्हणून हिवाळ्यात होणारी झाडांची पानगळ आता शिवाजी पार्क येथील दादासाहेब रेगे मार्गावरील अनेक झाडांची सुरू झाली आहे. येथील झाडांची हिरवी पाने गळून झाडे अक्षरश: बोडकी झाली आहेत. तर अनेक झाडे मृतप्राय बनू लागली आहेत. झाडांच्या या अवस्थेबाबत पर्यावरण प्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.

दादर परिसरातील शिवाजी पार्क, शिवसेनाभवनासमोर गोखले रोडवर भुयारी मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. या मेट्रो रेल्वेच्या कामामधील चिखलयुक्त पाणी सध्या दादासाहेब रेगे मार्गावरील पर्जन्य जलवाहिन्यांच्या मॅनहोल्समध्ये सोडले जाते. मात्र, आजवर मॅनहोल्समध्ये सोडले जाणारे हे चिखलमिश्रीत प्रदूषित पाणी मागील आठ दिवसांपासून पदपथाशेजारी थेट रस्त्यावर सोडले जात आहे. या पाण्यामुळेे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. परंतु हे चिखलमिश्रीत पाणी आता झाडांच्या मुळाशी झिरपत आहे. हे पाणी रस्त्यावर सोडले जात असल्यापासून या रस्त्यावरील अशोक, कडुलिंब आणि पर्जन्यवृक्ष आदी झाडांची पानगळ सुरू झाली आहे. हिरव्या, कोवळ्या पानांचा सडा झाडांखाली तसेच रस्त्यांवर पडलेला पहायला मिळत आहे.

अचानकपणे झाडांची पाने गळू लागल्याने स्थानिक रहिवाशी आणि पर्यावरणप्रेमी राजेश्री मनोहर आणि डॉ. सीमा खोत यांनी ही बाब महापालिकेच्या उद्यान विभागासह जी-उत्तर विभागाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर गुरुवारी मेट्रोच्या अधिकार्‍यांनी या भागातील चिखलयुक्त पाण्याचा निचरा केला, तसेच टँकरच्या पाण्याने रस्ते धुवून काढले. पानगळीमुळे झालेला पानाचा कचरा साफ केला. आता पाने गळून झाडे मृतप्राय बनत असल्याने ही झाडे वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या भागात जेव्हापासून मेट्रोच्या कामातील चिखलमिश्रीत पाणी रस्त्यावर सोडण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून अशोका, पर्जन्यवृक्ष, पिंपळ, कडुलिंब आदी झाडांची हिरवीगार पाने गळून पडू लागली. याबाबत तज्ज्ञांशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी चिखलमिश्रीत पाण्याबरोबरच मेट्रोच्या कामांमुळे निर्माण होणार्‍या धुळीचाही परिणाम झाडांवर होत असल्याचे त्यांनी सांगितले. या झाडांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांची पाने गळत आहेत. परंतु या झाडांच्या मुळांशी खतमाती घालणे, मेट्रोच्या कामांमुळे धूळ झाडांवर बसत असल्याने त्यावर सतत पाण्याचा फवारा मारणे आदी उपाययोजना सुचवल्या आहेत. म्हणून महापालिका या झाडांची मुळे स्वच्छ व साफ केल्यानंतर त्यांच्या मुळाशी माती व खत टाकले जाईल, असे राजेश्री मनोहर यांनी स्पष्ट केले.

First Published on: April 26, 2019 4:32 AM
Exit mobile version