CoronaVirus: लॉकडाऊन दरम्यान पैशांअभावी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल!

CoronaVirus: लॉकडाऊन दरम्यान पैशांअभावी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल!

प्रातिनिधीक फोटो

लॉकडाऊनमुळे आपल्या घरी न जाऊ शकल्याने वसतिगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे वसतिगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे अवघड होऊन बसले आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणेही अशक्य होत आहे. त्यामुळे आम्हाला घरी पाठवा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल लक्षात घेता त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना करण्यात आली आहे.

वसतिगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांची पैशांअभावी मोठी गैरसोय

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उद्योगधंदे, व्यवसाय, शेती ठप्प झाली आहे. त्यामुळे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना पैसे पाठवणे अशक्य झाले आहे. मुंबई विद्यापीठात वसतीगृहात राहुन शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण आणि कनिष्ठ उत्त्पन्न गटाची पार्श्वभूमी असणारे आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात अडकून पडले आहेत. त्यातच घराकडून पैसे येत नसल्याने त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठाने वसतिगृहातील उपहारगृह सुरू ठेवले असले तरी विद्यार्थ्यांना मोफत जेवण आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे सध्या जेवण हे उधारी खात्यावरच विद्यार्थी घेत आहेत. लॉकडाऊनमुळे मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांची पैशांअभावी मोठी गैरसोय होत आहे. कपडे धुण्यासाठी साबण, आंघोळीचा साबण, तेल, टूथपेस्ट, ब्रश यासाख्या खर्चासाठी विद्यार्थ्यांना पैशांची आवश्यकता आहे. परंतु खिशात पैसे नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ‘एकमेका साह्य करू’ या प्रमाणे विद्यार्थी एकमेकांना मदत करत असले तरी त्यांच्याकडील वस्तू संपल्यावर त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सध्या असलेली आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन वसतीगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी पत्राद्वारे कुलगुरुंकडे केली.


हेही वाचा – LockDown: मुंबईहून उत्तर प्रदेशला चालत गेला..पण क्वॉरंटाईन केल्यानंतर ६ तासांत झाला मृत्यू!


 

First Published on: April 28, 2020 3:47 PM
Exit mobile version