पावसाळ्यात समुद्रात २२ दिवस मोठी भरती ; दुर्घटना टाळण्यासाठी ‘फ्लड रेस्क्यू टीम’

पावसाळ्यात समुद्रात २२ दिवस मोठी भरती ; दुर्घटना टाळण्यासाठी ‘फ्लड रेस्क्यू टीम’

During the monsoon season, there will be 22 days of high tide

अतिवृष्टी झाल्यास सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचते. समुद्र खवळलेला असतो. अशा परिस्थितीत पर्यटक मौजमजा म्हणून समुद्रात मित्र – मैत्रिणीसह पोहायला जातात. मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यास एखादी अप्रिय घटना घडून ती जीवावर बेतू शकते. यास्तव, अशा घटना रोखण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात समुद्र चौपाटीवर पालिकेकडून ९४ लाईफ गार्ड तैनात करण्यात येणार असून त्यांच्या मदतीला अग्निशमन दलाकडून ‘फ्लड रेस्क्यू टीम’ही तैनात करण्यात येणार आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात आपत्कालीन घटना घडू नये यासाठी पालिका प्रशासन आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित ठेवते. पावसाळयात रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पालिका यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात येते. यंदाच्या पावसाळ्यात, १३ जून ते १३ सप्टेंबर या कालावधीत २२ दिवस समुद्रात मोठी भरती आहे. जून, जुलै महिन्यात प्रत्येकी ६ दिवस, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी ५ दिवस धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. किमान ४.५१ मिटर ते ४.८७ मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. नेमके त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पूरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने हे २२ दिवस मुंबईसाठी धोकादायक ठरू शकतात.

पावसाळ्यात बहुतांश मुंबईकर, पर्यटक विशेषतः तरुण, उत्साही लोक हे समुद्राच्या ठिकाणी म्हणजे गिरगाव, दादर, माहिम, आक्सा, मढ, जुहू, वर्सोवा, गोराई आदी चौपट्यांच्या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी धाव घेतात. काहीजण मद्यपान करून समुद्रात खोल पाण्यात जाऊन जीवनाची मजा, आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. मात्र जर खोल पाण्याचा अंदाज न आल्यास त्यांची ती मौजमजा त्यांच्या जीवावर भेटण्याची दाट शक्यता असते. असे घटनाप्रकार घडू नयेत यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई महापालिका अशा सर्व चौपटयांवर किमान ९० – ९४ लाईफ गार्ड तैनात करते. मात्र तरीही उत्साही लोक ऐकत नाहीत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याचे खापर मात्र पालिकेवर फोडण्यात येते.

यंदा अग्निशमन दलाकडून पावसाळ्यात समुद्र चौपाटीवर ‘फ्लड रेस्क्यू टीम’ तैनात करण्यात येणार आहे. ही टीम समुद्र चौपट्यांवर तैनात लाईफ गार्ड यांच्या मदतीला धावून जाणार आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असेल तर त्याला वाचविणे सहज शक्य होणार आहे. दरम्यान, समुद्र चौपाट्यांवर, समुद्रात खोल पाण्यात कोणीही जाऊन नये यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने गिरगाव चौपाटी येथे जनजागृती मोहीम राबवण्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमांतबपरब यांनी सांगितले.

First Published on: May 24, 2022 9:17 PM
Exit mobile version