अभियांत्रिकीची सीईटी होणार सोपी

अभियांत्रिकीची सीईटी होणार सोपी

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षेत (सीईटी) पारदर्शकता यावी यासाठी 2019 पासून ही परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन सीईटी देताना येणार्‍या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष वेब पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या वेबपोर्टलवर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी एक लाख प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीची सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपी व सुलभ होण्यास मदत होणार आहे.

राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमानंतर सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे असतो. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी दरवर्षी राज्यातून तीन ते चार लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. त्यामुळे या परीक्षेत पारदर्शकता यावी यासाठी अभियांत्रिकीची सीईटी ऑनलाईन घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सामाईक परीक्षा नियंत्रण कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात आला आहे. ऑफलाईन परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असे. तसेच परीक्षेत पारदर्शकता यावी यासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी सीईटी सेलकडून विशेष वेब पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. या वेबपोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी तब्बल एक लाख प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिक्षकांकडून मागवण्यात येणार्‍या एक लाख प्रश्नसंचातूनच सीईटीची प्रश्नपत्रिका बनवण्यात येणार आहे. त्यामुळे हे प्रश्नसंच सोडवल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असेल याचा अंदाज येईल व त्यांना अभ्यासासाठी मदत होईल, अशी माहिती महाराष्ट्र सामाईक परीक्षा नियंत्रण कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

अशी असेल प्रक्रिया

अभियांत्रिकी सीईटीसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क भरून नोंदणी केल्यानंतर त्यांना यूजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे. वेबपोर्टलवर यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून प्रश्नसंच उघडेल. विद्यार्थ्यांनी नोंदणी करताना भरलेल्या प्रत्येक विषयाचे एक लाख प्रश्नसंच त्यांना पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. हे प्रश्नसंच दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत. प्रश्नसंच सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व त्याचे गुण विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे होणार आहे.

शिक्षकांकडून मागवणार प्रश्नसंच

अभियांत्रिकी विषयातील राज्यातील विविध ठिकाणच्या शिक्षकांची यादी तयार करण्यात येणार आहे. ज्या शिक्षकांना 20 वर्षांचा अनुभव आहे, अशा शिक्षकांची यातून निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या शिक्षकांकडून किमान एक तर कमाल तीन प्रश्नसंच मागवण्यात येणार आहेत. प्रश्नसंच पाठवणार्‍या शिक्षकांना त्याचे मानधनही देण्यात येणार आहे.

ऑफलाईन परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असेल, अभ्यास कसा करायचा याची माहिती मिळत नव्हती. पण ऑनलाईन प्रश्नसंच उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची रुपरेषा ठरवणे सोपे होईल. प्रश्नसंचामुळे त्यांच्यासाठी परीक्षा सहज व सोपी होईल.
– आनंद रायते, आयुक्त, महाराष्ट्र सामाईक परीक्षा नियंत्रण कक्ष

First Published on: November 28, 2018 5:19 AM
Exit mobile version