ईदच्या आवाजाची पातळी नियंत्रणात

ईदच्या आवाजाची पातळी नियंत्रणात

कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव व नवरात्रोत्सवामध्ये आवाजाची पातळी नियंत्रणात राहिली होती. त्यापाठोपाठ आता ईदमध्येही आवाजाची पातळी नियंत्रणात असल्याचे समोर आले आहे. ईद-ए-मिलाददरम्यान काढण्यात येणार्‍या मिरवणुकीवेळी आवाज फाऊंडेशनकडून ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजली. त्यानुसार, इतर सणांप्रमाणे ईदच्या दिवशीही आवाजाची पातळी फारच कमी नोंदवण्यात आली.

ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाकडून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येते. त्यावेळी लाऊडस्पीकरवरून मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या जातात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भायखळ्यामध्ये फक्त एकच मिरवणूक काढण्यास परवानगी दिली होती. ही परवानगी देताना मिरवणुकीत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई घातली होती. भायखळा ब्रिज जंक्शन ते नागपाडादरम्यान केलेल्या सर्व्हेनुसार, या मार्गावरील वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आल्यामुळे या मार्गावर गाड्यांचा कोणताच आवाज नव्हता. यावेळी या मार्गावरील आवाजाची कमाल पातळी ६६.१ डेसिबल नोंदवली गेली. ईदमध्ये आतापर्यंतची सर्वात कमी आवाजाची पातळी नोंद झाली आहे. २०१८ मध्ये आवाजाची पातळी १०५.३ डेसिबल तर २०१७ मध्ये १०५.२ नोंदवली होती. मात्र २०१६ मध्ये सर्वाधिक १११.५ डेसिबल एवढी पातळी नोंदवण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जास्तीत जास्त झोन-निहाय डेसिबल पातळी कायम ठेवणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षात सणांच्या काळात कमी आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

सर्व सणांमध्ये लाऊडस्पीकरचा कमी वापर केला पाहिजे. या साथीच्या आजाराने हीच मुख्य गोष्ट शिकवली आहे, असल्याचे आवाज फाऊंडेशनकडून सांगण्यात आले. तसेच ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याच्या आणि मुंबईवरील सर्व नागरिकांना होणार्‍या आरोग्यासंबंधीचे धोके कमी करण्याच्या दृष्टीने आवाज फाउंडेशनकडून आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: November 1, 2020 5:26 PM
Exit mobile version