अंजली दमानिया यांच्याविरोधात खडसे जाणार सुप्रीम कोर्टात

अंजली दमानिया यांच्याविरोधात खडसे जाणार सुप्रीम कोर्टात

एकनाथ खडसे आणि अंजली दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातले राजकीय वितुष्ट पुन्हा एकदा टोकाला गेले आहेत. पुन्हा एकदा दमानिया आणि खडसे यांच्यातला वाद चव्हाट्यावर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एकनाथ खडसे दमानिया यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करणार आहेत. खडसे यांनी दमानिया यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. दमानिया यांनी याविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने दमानिया यांच्या विरोधातील दोन्ही एफआयआर रद्द केले आहेत. आता खडसे या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील करणार आहेत.

दमानियांचे आरोप बिनबुडाचे

अंजली दमानिया यांनी यापूर्वी खडसेंना खरे मर्द असाल, तर माझ्याशी हाय कोर्टात लढून दाखवा, असे आव्हान दिले होते. एकनाथ खडसे यांनी दमानिया यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे सांगितले होते. दमानिया यांनी इतक्यावरच न थांबता माझी प्रतिमा मलीन करुन बदनाम करण्यासाठी नसता खटाटोप केला. यात त्यांनी मला खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवण्याच्या उद्देशाने ‘चोपडा अर्बन को-ऑप. बँक लि.’ या बँकेचे खोटे चेक बनवले. हे चेक खरे म्हणून कोर्टात वापरल्याचा आरोप खडसे यांनी लावला. त्यामुळे दमानिया यांच्या विरोधातील लढाई सुप्रीम कोर्टात जिंकू, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.

गृहखाते कारवाई करत नाही

अंजली दमानियांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही त्या पोलिसांना आव्हान देतात. तरीही गृहखाते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. यामुळेच त्यांची हिंमत वाढत असावी, असाही दावा खडसे यांनी केला आहे. दमानिया यांच्याविरोधात आता खडसे थेट सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First Published on: November 19, 2018 10:10 PM
Exit mobile version