गृहनिर्माण योजनेतून पोलिसांनाही घरे मिळणार – एकनाथ शिंदे

गृहनिर्माण योजनेतून पोलिसांनाही घरे मिळणार – एकनाथ शिंदे

गृहनिर्माण योजनेतून पोलिसांनाही घरे मिळणार - एकनाथ शिंदे

राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनेत आता पोलिसांनाही घरे मिळणार आहेत. गृहनिर्माण योजनेमध्ये पोलिसांसाठी घरांचा कोटा राखीव ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे नगरविकास व जिल्ह्यचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या बदलापूर महोत्सवाला शनिवारी रात्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे आदींनी भेट दिली.

या कार्यक्रमात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले की; ‘निवडणुका, सण, उत्सव,आंदोलने अशा सर्व वेळी पोलीस रस्त्यावर उतरून कायदा-सुव्यवस्था राखत असतात. या पोलिसांना घराची चिंता असता कामा नये म्हणून पोलिसांसाठी गृहनिर्माण योजनेत घरांचा राखीव कोटा ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने दोन महिन्यात शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या राज्यात कुणीही उपाशी राहू नये यासाठी दहा रुपयांत पोटभर जेवणाची थाळी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. काही लोकांना हे होणार नाही,असे वाटत होते’. पण इच्छाशक्ती असली तर काय करता येतं हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे सत्ता देत असल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी बदलापूरच्या जनतेचे आभार मानले. नगर परिषदेच्या वतीने बदलापुरात करण्यात येत असलेल्या कामांबाबत माहिती देऊन आगामी काळातही बदलापूरच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही,अशी ग्वाहीही त्यांनी दिली. गेल्या सात वर्षांपासून बदलापूर महोत्सवाचे यशस्वी आयोजन करीत असल्याबद्दल त्यांनी शहरप्रमुख वामन म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

First Published on: February 17, 2020 8:26 PM
Exit mobile version