वृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

वृद्ध दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रातिनिधिक छायाचित्र

तळोजा भागात राहणार्‍या दिपक चव्हाण नावाच्या व्यक्तीने भाडेतत्वावर घेतलेल्या कारचे 65 हजार रुपये भाडे देण्यास
टाळाटाळ करून उलट शिवीगाळ व दमदाटी केल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने उंदिर मारण्याचे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत दिगंबर चव्हाण (60) या वृद्धाचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत झाला असून, त्यांची पत्नी सुषमा चव्हाण यातून बचावल्या आहेत. त्यांच्यावर नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर न्हावा शेवा पोलिसांनी दिपक चव्हाण याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेतील मृत दिगंबर चव्हाण यांचा मुलगा क्षमिक चव्हाण याने भाडेत्वावर चालविण्यासाठी मारुती सुझुकी रिट्स ही कार घेतली होती. महिन्याभरापूर्वी त्याने ओएलएक्सच्या माध्यमातून ओळख झालेल्या दिपक चव्हाण या व्यक्तीला आपली कार दरदिवशी 1500 रुपये प्रमाणे 25 दिवसांसाठी भाडेत्वावर चालविण्यास दिली होती. 25 दिवस पूर्ण झाल्यानंतर क्षमिक चव्हाण याने दिपक चव्हाण याला कारच्या भाड्यासाठी फोन केला असता, आरोपी दिपक चव्हाण याने 5-6 दिवसात भाडे आणि कार परत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे क्षमिक याने काही दिवसानंतर पुन्हा त्याला फोन केल्यानंतर त्याने त्याची कार परत देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे क्षमिकने आपल्या वडिलांसह तळोजा येथे प्रत्यक्ष जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांना सापडला नाही. त्यानंतर दिगंबर चव्हाण यांनी दिपक चव्हाण याला फोनवरून संपर्क साधला असता, त्याने भाडेतत्वावर घेतलेल्या कारचे पैसे देण्यास तसेच त्यांची कार परत देण्यास टाळाटाळ केली, तसेच त्याने दिगंबर चव्हाण यांना शिवीगाळ करून त्यांना दमदाटी केली. त्यामुळे दिगंबर चव्हाण हे मानसिक तणावाखाली आले होते.

त्यामुळे त्यांनी 3 मार्च रोजी घरामध्ये कुणीही नसताना पत्नी सुषमा चव्हाण यांच्यासह उंदीर मारण्याचे विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी क्षमिक चव्हाण याने लागलीच या दोघांना नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याठिकाणी या दोघांवर उपचार सुरू असताना त्यातील दिगंबर चव्हाण यांचा मृत्यू झाला. या घटनेतील मृत दिगंबर चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यात त्यांनी दिपक चव्हाण याने कारचे 65 हजार रुपये भाडे न दिल्याने, तसेच त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याने आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी दिपक चव्हाणवर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

First Published on: March 12, 2019 4:12 AM
Exit mobile version