केडीएमसीच्या तिजोरीची चावी कुणाकडे ?

केडीएमसीच्या तिजोरीची चावी कुणाकडे ?

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका

महापालिकेच्या तिजेारीची चावी समजली जाणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक शुक्रवार 3 जानेवारी रोजी होत आहे. त्यासाठी बुधवार 1 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. पालिकेत अजूनही शिवसेना भाजपची युती कायम आहे. मात्र नव्या महाविकास आघाडीच्या बदलत्या राजकारणामुळे या निवडणूकीकडे विशेष लक्ष लागले आहे. वर्षभरात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने, सभापतीपदाची निवडणूक अत्यंत महत्वाची समजली जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे नवे सरकार स्थानापन्न झाले असले तरी सुध्दा कल्याण डोंबिवली महापालिकेत आजही शिवसेना- भाजप युतीची सत्ता आहे. सध्या शिवसेनेकडे महापौरपद तर उपमहापौरपद हे भाजपकडे आहे. मागील महिन्यातच स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यावेळीच सभापती दिपेश म्हात्रे यांची सदस्य पदाची मुदत संपल्याने सभापतीपदासाठी 3 जानेवारीला निवडणूक होत आहे. स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. त्यात शिवसेना 8, भाजप 6 मनसे 1 आणि काँग्रेस 1 असे पक्षीय बालबल आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचेच वर्चस्व स्थायी समितीत आहे. त्यामुळे शिवसेनेचा सभापती होणार हे स्पष्ट दिसून येत आहे.

भाजपचे स्वप्न भंगणार ?

महापालिकेत युतीची सत्ता असल्याने आतापर्यंत शिवसेना भाजपने पालिकेतील पद ही आलटून- पालटून वाटून घेतली आहेत. त्यामुळे युतीच्या वाटपात यंदाचे सभापतीपद हे भाजपाच्या वाट्याला आहे. त्यामुळे भाजपकडून जोरदार मेार्चेबांधणी सुरू आहे. मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाल्याने, शिवसेनेने सभापतीपदावर प्रखर दावा केला आहे. शिवसेना सभापतीपद हे भाजपला सोडण्यास तयार नाही. विशेष म्हणजे स्थायी समितीत महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेकडून सभापतीपदासाठी जोरदार फिल्डींग लावण्यात आली आहे. त्यामुळे सभापतीपदाचे भाजपचे स्वप्न भंगणार आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे, महेश गायकवाड आणि गणेश कोट ही तीन नावे चर्चेत आहेत. त्यापैकी म्हात्रे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसवेक असून त्यांना सभापतीपद भूषविल्याचा दांडगा अनुभव आहे. तर गायकवाड आणि कोट यांना सभापतीपदाचा अनुभव नाही. वर्षभरात पालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी शिवसेनेकडून अनुभवी, कि नवख्या कोणत्या सदस्याच्या नावाची शिफारस करणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

First Published on: January 1, 2020 3:03 AM
Exit mobile version