ठाण्यात निवडणुकीतील कामांच्या नेमणुकीत घोळ

ठाण्यात निवडणुकीतील कामांच्या नेमणुकीत घोळ

ठाण्यात निवडणुकीतील कामांच्या नेमणुकीत घोळ

दर पाच वर्षांनंतर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सार्वत्रिक निवडणुका होत असतात. मात्र, असे असूनही त्याचे कामकाज पाहण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांना जुंपले जाते. त्यात अनेकदा पद आणि पात्रतेचा विचार न करता नेमणुका केल्या जात असतात. ठाणे जिल्ह्यातील निवडणूक कामांचे वाटप करताना यंदाही तसाच घोळ झाला आहे. महाविद्याालयात शिपाई म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चक्क मतदान केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या हाताखाली महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक केली गेली आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून झालेली ही गफलत लक्षात आल्यानंतर संबंधितांकडून ही नेमणूक रद्द करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि अधिकारी वर्ग लागतो. ठाणे जिल्ह्यातील निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी साठ हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. संबंधित विभागाकडून आम्ही कर्मचाऱ्यांचा तपशील मागवतो. ती माहिती आमच्या संगणकीय प्रणालीत जोडली जाते. कर्मचाऱ्यांचे पद, वेतन आदी बाबी विचारात घेऊन नेमणूका केल्या जातात. मात्र, काही ठिकाणी फक्त वेतनश्रेणी विचारात घेतल्याने अशा चुका झाल्या आहेत. वर्ग-१ च्या अधिकाऱ्यांची अनवधनाने वर्ग-३ च्या कामांसाठी नेमणूक करण्यात आली. तसेच काही ठिकाणी उलटेही झाले आहे. मात्र, हा झालेला प्रकार लक्षात येताच ही चूक दुरूस्त करण्यात आली असून प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याची त्यांच्या योग्यतेच्या कामी नियुक्ती करण्यात येत आहे.

–राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

उच्च वर्गांना कमी दर्जाची कामे

दरम्यान अन्य काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदापेक्षा कमी दर्जाची कामे देण्यात आल्याचे बोलले जात आहे. एका शासकीय विभागातील शेकडो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर शाई लावण्याचे काम देण्यात आले होते. त्या विभागाने ही बाब निर्दशनास आणून दिल्यानंतर या नेमणूका रद्द करण्यात आल्या. मतदानासाठी उपलब्ध झालेल्या कर्मचाऱ्यांचा हुद्दा, त्यांचे पद विचारात न घेता नेमणूका केल्याने हा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.

First Published on: April 22, 2019 7:56 PM
Exit mobile version