अत्यावश्यक सेवांसह इतर सेवांचे कर्मचारी बनले कोरोनाचे वाहक

अत्यावश्यक सेवांसह इतर सेवांचे कर्मचारी बनले कोरोनाचे वाहक

कोरोना कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर नागरिक घरी बसले असले तरी अत्यावश्यक सेवांसह इतर आवश्यक सेवांचे कामगार, कर्मचारी हे सेवेत कार्यरत आहे. परंतु आपली सेवा बजावणारे कामगार, कर्मचारी हे संध्याकाळी पुन्हा घरीच परतत आहे. त्यामुळे सध्या समाजातील संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी या सेवा बजावणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होवू लागले आहे. मुंबईसह मुंबईच्या बाहेर राहणारे बाधित रुग्ण सध्या कारोनोच वाहक म्हणूनच काम करत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिक आणि कुटुंबांनी स्वत:ला घरातच स्थानबध्द करून घेतले आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्याचा प्रयत्न होत असला तरी सध्या घरात बसलेल्या नागरिकांऐवजी कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांनाच अधिक कोरोनाची बाधा होत असल्याची बाब समोर येत आहे. मागील दहा दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, हॉटेलचा डिलिव्हरी बॉय, मेडिकल दुकान तसेच मेडिकल प्रतिनिधी, पत्रकार, महापालिकेचे कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये सक्रीय असणारे कर्मचारी आदींचाच भरणा आहेत.

महापालिकेच्या सहायक आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत, ते कुणाच्या संपर्कात आले म्हणून बाधित झालेले नाहीत. तर महापालिकेच्या रुग्णालयांसह शासकीय व खासगी रुग्णालये, प्रसुतीगृह, आरोग्य केंद्र यातील डॉक्टर्स, नर्सेस, आरेाग्य सेविका, वॉर्डबॉय, सुरक्षा रक्षक यांच्यासह डिलिव्हरी बॉय, धान्य दुकानांसह औषध दुकानांचे कामगार असेच आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची सेवा बजावताना हेच कर्मचारी सध्या कारोनाचे वाहक बनल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कामगार, कर्मचाऱ्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केल्यास त्यांच्यापासून लोकांना होणारा प्रादुर्भाव रोखता येवू शकतो. मुंबई महापालिकेने आपल्या सर्व रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये ज्यांची ज्यांची मदत घेतली जाते, त्यांच्या जवळच्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे.

चेंबूर घाटला या परिसरातही काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. याबाबत स्थानिक शिवसेना नगरसेवक व  बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, सध्या जे बाधित रुग्ण आढळून आले आहेत, ते सर्व कामानिमित्त घराबाहेर पडणारे आहेत. यामध्ये काही रुग्णालयांच्या नर्सेस आहेत,तर काही पत्रकार, काही हॉटेलमध्ये डिलिव्हरी बॉय तसेच बांधकामांच्या ठिकाणी काम करणारे कामगार आदी आहेत. त्यामुळे आज जो नागरिक घरात राहत आहे, त्यांना याची बाधा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वच रुग्णालयांकडून लपवती जाते बाधित कर्मचाऱ्यांची माहिती

सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार राबवणाऱ्या यंत्रणांमधील बहुतांशी रुग्णालयांचे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आयामावशी तसेच सुरक्षा रक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. परंतु ही सर्व माहिती लपवली जात आहे. जे.जे. रुग्णालयासह केईएम, शीव, नायरसह उपनगरीय रुग्णालयांमधील वैद्यकीय व निम वैद्यकीय कर्मचारी हे कोरोनाबाधित रुग्ण असूनही सहकारी कर्मचाऱ्यांपासून त्यांची माहिती लपवली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येच भीतीचे वातावरण पसरले आहे.

First Published on: May 11, 2020 5:25 PM
Exit mobile version