मुलींच्या सक्षमीकरणासाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर

मुलींच्या सक्षमीकरणासाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमावर भर

एसएनडीटी विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थिनींचा कल कोणत्या अभ्यासक्रमाला असतो
प्रो. वंझारी – एसएनडीटी विद्यापीठातील प्रत्येक अभ्यासक्रम हा काळाच्या गरजेनुसार बनवण्यात आलेला आहे. प्रत्येक मुलीला रोजगाराभिमुख अभ्यासक्रम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यापीठातील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याप्रमाणेच होम सायन्स, नर्सिंग, सायकोलॉजी या अभ्यासक्रमांना विद्यार्थिंनींकडून सर्वाधिक पसंती असते. या अभ्यासक्रमासाठी असलेल्या जागांपेक्षा मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींचे अर्ज येत असतात. त्याचप्रमाणे विद्यापीठाकडून राबवण्यात येत असलेल्या छोट्याछोट्या अभ्यासक्रमांनाही विद्यार्थिनींची प्रचंड पसंती आहे.

या अभ्यासक्रमांना पसंती असण्याचे नेमके कारण काय?
प्रो. वंझारी – स्वत:च्या पायावर मुलींना उभे राहता यावे यादृष्टीकोनातून विद्यापीठातील प्रत्येक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक अभ्यासक्रम हा रोजगाराभिमुख असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थिनींना नोकरी किंवा अन्य रोजगार उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच शिक्षण घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थिनींसाठी विद्यापीठाकडून शिक्षण पूर्ण झाल्यावर प्लेसमेंट देण्यात येते. प्लेसमेंटमुळे विद्यार्थिनींना आपण घेत असलेल्या शिक्षणातून आपल्या रोजगार उपलब्ध होण्याची संधी असल्याची खात्री असते. व्होकेशन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना नोकरीबरोबरच शिक्षण घेता येत असल्याने व्होकेशनल अभ्यासक्रमांना विद्यार्थिनींची अधिक पसंती असते.

विद्यापीठाकडून यंदा कोणते नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.
प्रो. वंझारी – एसएनडीटी विद्यापीठाकडून दरवर्षी तीन ते चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असतात. यावर्षीही विद्यापीठाकडून चार नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये दोन डिप्लोमा तर दोन व्होकेशनल अभ्यासक्रम सुरू केले आहेत. डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये इंटिरियर डिझाइनिंग व ग्राफिक तर व्होकेशनल अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आम्ही यावर्षी मास्टर ऑफ डिझाईन हा नवीन कोर्स सुरू केला आहे. एम.डिझाईन कोर्स मुंबईमध्ये सुरू करणारे एसएनडीटी विद्यापीठ हे एकमेव आहे. लवकरच एसएनडीटीच्या पुण्याच्या कॉलेजमध्ये एमबीए हा अभ्यासक्रम सुरू करणार असून, त्याला एआयसीटीईची मान्यताही मिळाली आहे. गतवर्षी एमएसस्सी डायटिशन हा अभ्यासक्रम सुरु केला होता. तसेच बी.ए म्युझिक, बीए ड्राईंग अ‍ॅण्ड पेंटिंग, नर्सिंग, एमएस्सीचे पाच विषय, टेक्सटाईल अ‍ॅण्ड अ‍ॅप्रल डिझाईन, ह्युमन डेव्हलमेंट, फूड अ‍ॅण्ड न्यूट्रिशन, बी.एड, एम.एड त्याचप्रमाणे आर्ट्स कॉमर्स इत्यादी हे अभ्याक्रमही विद्यापीठाकडून शिकवले जातात.

विद्यापीठातील छोट्या कोर्सेंना किती पसंती मिळते
प्रो. वंझारी – मुलींना रोजगारक्षम अभ्यासक्रम मिळावा यासाठी विद्यापीठाकडून अनेक छोटेछोटे अभ्यासक्रम राबवण्यात येतात. यामध्ये पॉलिटेक्निकचे जवळपास 70 ते 80 अभ्यासक्रम आहेत. डिप्लोमा इन ऑफिस एक्झिक्युटीव्ह, ऑफिस अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह, डिप्लोमा इन फूड न्यूट्रिशन, डिप्लोमा इन टेक्सटाईल असे छोटे कोर्स करणार्‍या विद्यार्थिनींना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लगेचच प्लेसमेंटच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतो.

एसएनडीटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे.
प्रो. वंझारी – विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालते. सध्या विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया 1 जूनपासून सुरू करण्यात आली असून, 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती https://sndt.ac.in या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेश घेण्याबाबत विद्यार्थिनींना काय सल्ला द्याल
प्रो. वंझारी – एसएनडीटी विद्यापीठासह अन्य विद्यापीठ, कॉलेजांमधील सर्वच अभ्यासक्रम हे चांगले असतात. त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी मुलींनी त्यांना कोणत्या विषयात रुची आहे हे पाहणे गरजेचे आहे. आपल्याला काय करायचे आहे, कोणत्या दिशेने जायचे हे ठरवणे महत्त्वाचे आहे.अ‍ॅडमिशन घेण्यापूर्वी मुलींनी आपली रुची काय आहे. आपल्याला काय करायचे आहे. कोणत्या दिशेने जायाचे हे ठरवायचे आहे. कोर्सेस सर्व चांगले आहेत. प्रवेशाबाबत अनेकांशी चर्चा करावी, पण निर्णय स्वत: घ्यावा. इंटरनेटवर सर्व विषयांची सविस्तर माहिती मिळते. त्यामुळे आपण सतर्क राहून आपला निर्णय घ्यायला पाहिजे. मैत्रिणी, शिक्षक, पालक सांगतात म्हणून प्रवेश घेऊ नये. एखाद्या विषयात मुलीने पालकांचे ऐकून निर्णय घेतला आणि तिला त्यामध्ये रुची नसेल तर तिच्या कामाची दिशा बदलू शकते व त्याचा परिणाम तिच्या आयुष्यावर होऊ शकतो. त्यामुळे मुलींनी त्यांना रुची असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा.

First Published on: June 11, 2019 5:25 AM
Exit mobile version