रिकामी गावे, मरणासन्न मुके प्राणी

रिकामी गावे, मरणासन्न मुके प्राणी

Animals

नवी मुंबई विमानतळासाठी गावे रिकामी झाल्यावर गावात केवळ मुके प्राणी आणि जनावरे राहिली आहेत. मानवी वस्ती असल्यामुळे या ठिकाणी प्राण्यांना अन्न पाणी मिळत होते. मात्र, आता प्रकल्पासाठी गावे रिकामी केल्यावर या माणसांवर अवलंबून असलेल्या प्राण्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्राण्यांचीही भूतदयेच्या भावनेतून जगण्याची सोय करावी, अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे, तसेच नवी मुंबई अ‍ॅनिमल प्रोटेक्शन सेलच्या वतीने पाठपुरावा केल्यावर आता या ठिकाणी इन डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल या संस्थेच्या वतीने कुत्र्यांना उपचारासाठी पनवेलमधील श्वान नियंत्रण केंद्रात नेण्यात आले.

गणेश पुरीवरचे ओवळे या गावात आता केवळ मोकळ्या भिंती आणि ओसाड जागा शिल्लक आहेत. तिथे गावातील जनावरे अन्नाच्या शोधात फिरताना दिसत आहेत. या मुक्या प्राण्यांना नवी मुंबई अ‍ॅनिमल प्रोटेक्शन सेलच्या वतीने त्यांचे कार्यकर्ते जेवणपाणी देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मुक्या जनावरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही प्राणी मित्रांनी पुढे येऊन प्राण्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको प्रशासनानेही त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याची गरज आहे. यासाठी प्राणीमित्रांनी सिडकोकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत मनेका गांधी यांना ट्विटरवरून माहिती दिल्यावर सिडकोच्या अधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांच्या केंद्रातील इन डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल या संस्थेच्या वतीने या ठिकाणी गाडी पाठवून जखमी, उपचाराची गरज असलेल्या कुत्र्यांना पनवेल केंद्रात नेण्यात आले.

आता या ठिकाणी 7 कुत्र्यांना लसीकरण आणि उपचारासाठी नेण्यात आले आहे. या भागात अनेक पाळीव प्राणी आहेत. त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. पनवेलमधील अनामिका चौधरी यांनीही काही प्राण्यांना आपल्या निवारा केंद्रात नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी आर्थिक बाजू कोण सांभाळणार, हा प्रश्न पुढे येत आहे. त्यामुळे सिडकोने या प्राण्यांचेही पुनर्वसन करावे, अशी मागणी इन डिफेन्स ऑफ अ‍ॅनिमलच्या आरती चौहान यांनी केली आहे.

First Published on: February 15, 2019 4:45 AM
Exit mobile version