ठाण्यातील नालेसफाईला अतिक्रमणे आडवी

ठाण्यातील नालेसफाईला अतिक्रमणे आडवी

नाल्यावरील अतिक्रमण

सुबोध शाक्यरत्न

नाल्यावर असलेली अतिक्रमणे, खाडीकिनारी भराव टाकून उभारण्यात येत असलेली गृहसंकुले तसेच नाल्याचे मुख मोठे करण्यात ठामपा प्रशासनाला कोणतीही आस्था नसल्याने शहरातील बहुतांश भागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबणार आहे. या नाल्यांचे रुंदीकरण आणि सफाई करण्यासाठी आधी त्यावरील बेकायदा बांधकामे हटवण्याची गरज आहे. मात्र, हे शक्य होण्याची चिन्हे नसल्याने यंदाही या भागात पाणी तुंबणार आहे. त्यामुळे १ मे पासून सुरू झालेली नालेसफाई ३१ तारखेपर्यंत पूर्ण होण्याचीही शक्यता नाही.

अनधिकृत बांधकाम पाडून बरेच आर्थिक नुकसान
शहरातील बहुतांश नाल्यांच्या कचराकुंड्या झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील स्टेशन रोड, प्रभात सिनेमाजवळील नाल्यावरील अनधिकृत बांधकामे पडून बरेच आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे नाल्यावरील उर्वरित अनधिकृत बांधकामांवर आयुक्तांनी हातोडा चालवला. या घटनेमुळे आयुक्तांनी शहरातील सर्व नाले अनधिकृत बांधकामांपासून मुक्त करण्याचे आदेश दिले. तरीही नाल्यावर स्लॅब टाकून दुकाने मांडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई पालिकेने केलेली नाही.
रस्ता रुंदीकरणासाठी मोठा फौजफाटा घेऊन येणारे पालिका आयुक्त या नाल्यावर उभारण्यात आलेल्या बांधकामांवर हातोडा का चालवत नाहीत, असा प्रश्न आहे. नाल्यांपासून १५ मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास सरकारने मज्जाव केला आहे. मात्र, हा नियम सर्रास धाब्यावर बसवून ठाण्यातील प्रभात सिनेमाच्या बाजूला असलेल्या नाल्यावरच दुकाने थाटलेली आहेत. अतिवृष्टीमुळे या नाल्यावर असलेली इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने कोसळून पडली होती.

अद्यापही नाल्यात पडलेला बांधकामाचा ढिगारा तसाच
यामुळे फार मोठी वित्तहानी झाली होती. मात्र दोन वर्षे उलटूनही ठाणे महानगरपालिकेने अद्यापही या नाल्यात पडलेल्या बांधकामांचा ढिगारा उचललेला नाही. त्याच्याच पुढील बाजारपेठेकडील बाजूस त्या नाल्यांवर स्लॅब टाकून रेडीमेड कपड्याची दुकाने उभी राहिली आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर पाणी साठण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकात्मिक नाले विकास योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणची अतिक्रमणे हटविल्याचा दावा ठामपाच्या वतीने केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील नाले दुथडी भरून वाहतात आणि त्यावर अतिक्रमण केलेल्या बांधकामांची चिखलमाती होते. मुसळधार पावसात अक्राळविक्राळ रूप धारण करणारे नाले शेकडो प्रसंगी घरांमधील सामानसुमान वाहून नेतात. हजारो कुटुंबांना रस्त्यावर आणतात. नालेसफाई योग्य पद्धतीने आणि वेळेवर होत नसल्याने या प्रकाराला ठाणेकरांना नेहमीच सामोरे जावे लागत आहे.

परिस्थिती जैसे थे 
ठाणे शहरातल्या नालेसफाईच्या कामांबद्दल ठामपाची आस्था पाहिली तर ही परिस्थिती जैसे थेच दिसून येते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नाल्यावरील दुकानांना परवानगी कशी मिळाली. कुणाच्या वरदहस्ताने ही दुकाने उभी राहिली. अद्याप या बांधकामांकडे ठामपाचे लक्ष का जात नाही असा सवाल येथील परिसरात राहणारे किशोर शेलार यांनी केला आहे.

First Published on: May 29, 2018 7:47 AM
Exit mobile version