२४ लाख पेशंटसाठी ४४४ डॉक्टर्स

२४ लाख पेशंटसाठी ४४४ डॉक्टर्स

IESC HOSPITAL KANDIVALI

खाजगी नोकर्‍यांमधील तुटपुंजा पगारामुळे आरोग्य विमा काढणे प्रत्येकाला शक्य नसते. त्यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी असलेल्या राज्य कामगार विमा योजनेत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. मुंबई व ठाण्यामध्ये तब्बल 24 लाख 7 हजार 910 विमा व्यक्तींची नोंद झाली असली तरी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी असलेल्या डॉक्टरांची संख्या फारच तुटपुंजी असल्याचे उघड झाले आहे. विमा व्यक्तींना पगारातून विम्याचे पैसे कापूनही वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे विमा व्यक्तींमध्ये संतापाचे वातावरण आहे

खासगी क्षेत्रात काम करणार्‍या व ज्या कर्मचार्‍यांचे किमान वेतन 21 हजारपेक्षा कमी आहे अशा कर्मचार्‍यांना उत्तम आरोग्य सुविधा स्वस्तात मिळाव्यात यासाठी सरकारतर्फे राज्य कामगार विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मुंबई व ठाण्यामध्ये तब्बल 24 लाख 7 हजार 910 विमा व्यक्तींची नोंद झाली आहे. या विमा व्यक्तींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी ईएसआयसीने विभागवार डॉक्टरांची (आयएमपी) नियुक्ती केली आहे

या डॉक्टरांकडे विमा व्यक्तींनी नोंद केल्यानंतर त्या डॉक्टरकडून विमा व्यक्तीवर मोफत उपचार करण्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्यांना या सुविधेचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. परिणामी कंपनीने विमा कार्ड काढताच अनेकजण या डॉक्टरांकडे नोंदणीसाठी जातात; परंतु प्रत्येक डॉक्टरला दोन हजारचा कोटा असल्याने फक्त तेवढ्याच व्यक्तींची नोंद डॉक्टरकडे होते

मुंबई व ठाण्यामध्ये नोंद असलेल्या 24 लाखांपेक्षा अधिक विमा व्यक्तींसाठी फक्त 444 डॉक्टरांची ईएसआयसीकडून नेमणूक करण्यात आली आहे. ही संख्या फारच तुटपुंजी आहे. कोटा पद्धतीनुसार डॉक्टरांकडे 8 लाख 88 हजार विमा व्यक्तींचीच नोंद आहे. त्यामुळे उर्वरित विमा व्यक्ती डॉक्टरकडे नोंद करण्यास गेले असता त्यांना डॉक्टर नोंद करण्यास नकार देतात. त्यामुळे उर्वरित तब्बल 15 लाख 19 हजार 910 व्यक्तींना किरकोळ आजाराच्या उपचारासाठी ईएसआयसीच्या रुग्णालयातच जावे लागते. ही रुग्णालये मुंबई व ठाण्यामध्ये काही ठराविक भागात असल्याने विमा व्यक्तीला किरकोळ आजारासाठी बराच प्रवास करावा लागतो. त्यासाठी अनेक दात्यांना कामावर सुटी घ्यावी लागते व लांबचा प्रवास करावा लागत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो

विमा व्यक्तींची वाढती संख्या पाहता दोन वर्षांपूर्वी डॉक्टरांकडील एक हजारांचा कोटा वाढवून दोन हजार करण्यात आला आहे. परंतु अनेक डॉक्टरांचे दवाखाने छोटे असल्याने जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

डॉ. राजेश स्वामी, संचालक (वैद्यकीय), ईएसआयसी

माझ्या परिसरातील ईएसआयसीच्या डॉक्टरांकडील कोटा पूर्ण झाल्याने त्यांनी माझे कार्ड नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यामुळे मला मुलुंडमधील ईएसआयसी रुग्णालयात जाऊन नोंद करावी लागली. परंतु माझ्या घरातील कोणी आजारी पडल्यास मला कामावर सुटी घेऊन मुलुंड रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे कामाचा एक दिवस खाडा होऊन त्याचा पगारही कापला जातो. विक्रोळीवरून मुलुंड येथील रुग्णालयात जाण्यासाठी लागणारा वेळ, प्रवास आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरतो          

   –बाबासाहेब शिरसाट, विमा व्यक्ती.

First Published on: October 27, 2018 4:51 AM
Exit mobile version