बेस्ट कर्मचार्‍यांच्या बोनसमध्येही कट

बेस्ट कर्मचार्‍यांच्या बोनसमध्येही कट

बेस्ट बस

सगळा दिवाळी सण संपला आणि बेस्ट कर्मचार्‍यांच्या खात्यात दिवाळी संपल्यानंतर बोनस दाखल झाला. पण हा बोनसदेखील कर्मचार्‍यांना संपातील कालावधीचे पैसे वगळून मिळाला आहे. त्यामुळे आधीच बोनससाठी विलंब झालेला असतानाच बेस्ट कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आनंदात विरजण पडल्याची कुरबुर ऐकायला मिळत आहे.

बेस्ट कर्मचार्‍यांना संपूर्ण दिवाळी संपल्यानंतर भाऊबीजेनंतर ९१०० रूपये इतका बोनस देण्यात आला. ही बोनसची रक्कम कर्मचार्‍यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाली. पण अनेक कर्मचार्‍यांना आणि अधिकार्‍यांनाही संप कालावधीत जितके दिवस गैरहजेरी तितक्या दिवसांची कपात बोनसच्या रकमेत करण्यात आली आहे. अवघ्या एका दिवसाच्या संपासाठीही बेस्ट कर्मचार्‍यांचा पगार कापण्यात आला आहे. त्यामुळे बेस्ट अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये बेस्ट व्यवस्थापनाच्या भुमिकेबाबत कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आधीच बोनस उशिरा मिळाला. त्यामध्येही संप कालावधीत गैरहजर असल्यामुळे कात्री लावण्यात आली अशी नाराजी बेस्ट कर्मचारी आणि अधिकारी वर्गातून एकायला मिळत आहे. तर बोनस किंवा पगार यापैकी एक तरी रक्कम लवकर मिळायला हवी अशी अपेक्षा बेस्ट कर्मचार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत होती. पण दोन्हीपैकी एकही रक्कम दिवाळीआधी मिळाली नाही.

बेस्ट कर्मचार्‍यांचा बोनस मिळणार की नाही अशी धाकधुक लागलेली असतानाच अखेर बेस्ट कर्मचार्‍यांसाठी बोनस जाहीर झाला. ऐन दिवाळीत बेस्ट व्यवस्थापनाने याबाबतची घोषणा केली. पण ही बोनसची रक्कम दिवाळीतील भाऊबीज संपल्यानंतरही मिळाली नाही. दिवाळी संपल्यावर दोन दिवसांनी बोनसची रक्कम बेस्ट कर्मचार्‍यांच्या आणि अधिकार्‍यांच्या खात्यात जमा झाली. पण ही रक्कम काटछाट करून आल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता संप कालावधीतील पैसे कापल्याचे लक्षात येताच कर्मचारी व अधिकारी वर्गात नाराजी पसरली.

First Published on: November 5, 2019 6:29 AM
Exit mobile version