यंदाही बाप्पांचा मार्ग खड्ड्यातून

यंदाही बाप्पांचा मार्ग खड्ड्यातून

मुंबईत गणरायांसोबत पावसाचेही आगमन झाले. सलग आठ दिवसांपासून मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे महापालिकेने बुजवलेले रस्त्यांवरील खड्डे पुन्हा पूर्वस्थितीत आले आहेत. पावसाची संततधार कायम राहिल्यामुळे खड्डे बुजवण्यात महापालिकेला अडचणी येत आहेत. अशा वेळी गुरुवारी, अनंत चतुर्दशी गणरायांना खड्ड्यांमधूनच निरोप द्यावा लागणार आहे.

तूर्तास महापालिका या खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसवून रस्ते सुरळीत करत आहे. दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर आता ११ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे हे खड्डे बुजवण्याचे महापालिका कसोशीने प्रयत्न करत आहे. तरीही विसर्जन मार्गांवरील खड्ड्यांचे संकट दूर झालेले नाही. अनेक भागांमध्ये हे खड्डे कायम आहेत. सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी पेव्हरब्लॉक उखडले आहेत. याशिवाय अनेक मॅनहोल्सच्या आसपासचा परिसर खचलेला आहे. मुसळधार पावसामुळे बुजवलेले सर्वच खड्डे पुन्हा उघडे पडू लागल्यामुळे महापालिकेला आता पावसाच्या विश्रांतीची प्रतीक्षा आहे. पावसाने उघडीप घेतल्यानंतर खड्डे बुजवण्याचा मार्ग खुला होणार आहे. सर्व विभागीय सहायक आयुक्तांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे सक्त आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पोटहोल ट्रॅकींग सिस्टीमच बंद
महापालिकेच्यावतीने यापूर्वी पोटहोल ट्रॅकींग सिस्टीमचा वापर करण्यात आला होता, परंतु या ट्रॅकींग सिस्टीममुळे खड्ड्यांची अचूक माहिती समोर येत असल्यामुळे महापालिकेने ही सिस्टीम बंद केली. परंतु कोर्टाने ही सिस्टीम पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिल्यानंतर, महापालिकेने याची तयारी दर्शवली. परंतु प्रत्यक्षात ही सिस्टीम अद्यापही राबवली जात नाही.

First Published on: September 9, 2019 1:28 AM
Exit mobile version