केईएममध्ये सुरू होणार संध्याकाळची जनरल ओपीडी

केईएममध्ये सुरू होणार संध्याकाळची जनरल ओपीडी

पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये आता संध्याकाळीही ओपीडीतून उपचार मिळणं शक्य होणार आहे. कारण, येत्या काही काळात संध्याकाळच्या वेळेसही जनरल ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे, संध्याकाळच्या वेळेस आपातकालीन विभागात होणारी गर्दी नियंत्रणात येण्यास मदत होईल. शिवाय, रुग्णांनाही उपचार मिळणं सोयीचं होईल हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

तसंच, पावसाळ्यात पालिका हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रूग्णांचा भार पाहता मुंबई महापालिका हॉस्पिटलच्या अखत्यारित्य येणारे दवाखाने संध्याकाळी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार, आता पालिका दवाखान्यांसह केईएम हॉस्पिटलची ओपीडीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात सुरू झालेल्या जनरल ओपीडीत सतत तापाचे रुग्ण दाखल होत होते. त्यामुळे सायंकाळच्या वेळेसही ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता याच ओपीडीचं रुपांतर कायमस्वरुपी ओपीडीत केलं जाणार आहे. या ओपीडीत सर्व प्रकारचे रुग्ण तपासले जाणार आहेत.

पावसाळ्यात जी मान्सून ओपीडी संध्याकाळी सुरू करण्यात आली आहे. त्याच ओपीडीचं रुपांतर जनरल ओपीडीत केलं जाणार आहे. ज्यामुळे, प्रत्येक रुग्णाला वाचवता येईल. अनेकदा सकाळच्या वेळेस असणाऱ्या ओपीडीसाठी न पोहोचणाऱ्या रुग्णाला आपातकालीन विभागात पाठवलं जातं. त्या विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. एखादा गंभीर रुग्ण आल्यास त्यावर तातडीने उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे गंभीर नसलेल्या रुग्णांना स्वतंत्र विभागात उपचार मिळावे यासाठी संध्याकाळी सुद्धा सर्वसाधारण बाह्यरुग्ण विभाग (जनरल ओपीडी) सुरू करण्यात येणार आहे.
डॉ. हेमंत देशमुख, केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता

First Published on: October 31, 2019 6:35 AM
Exit mobile version