मुंबईतील प्रत्येक चौथ्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोका

मुंबईतील प्रत्येक चौथ्या व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा धोका

मधूमेह

मुंबईतील बदललेल्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारही बळावले आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत आजारांची संख्या आणि प्रमाण ही वाढले आहे. यातून होणारे असंसर्गजन्य आजार ज्यांची तीव्रता हळूहळू वाढत असल्याचे जाणवत आहे. यातून सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे हृदयावर. त्यात मधुमेह, उच्चरक्तदाब, कॅन्सर या आजारांचा समावेश आहे.

हे सर्वच आजार खरंतर ‘सायलेंट किलर’ नावाने ओळखले जातात. त्यातही मधुमेह या आजारावर तो बळावू नये म्हणून नियंत्रण करता येऊ शकते. पण, आजारांविषयी माहितीच नसल्याने लोक याकडे दुर्लक्ष करतात.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरांमध्ये ५९० लोकांच्या तपासण्या केल्या गेल्या. त्यात, २६ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचं निदान झालं. तर, २५ टक्के लोकांना ते मधुमेहाचे शिकार झाले असल्याचं कळालं. उच्चरक्तदाब किंवा मधुमेह हे आजार जरी असले तरी त्याबद्दल तेवढ्या प्रमाणात गांभीर्य नसल्याकारणाने लोकांना या आजारांबाबतची तीव्रता कळत नाही.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या शिबिरातून एकूण ५९० जणांची तपासणी करण्यात आली. माहिम, मालाड मालवणी आणि चेंबूर या भागात ही शिबीरं राबवण्यात आली. साधारण ४० ते ५० वयोगटातील लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब असल्याचं पालिकेच्या आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी सांगितलं आहे.

” मार्च महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी सहा वैद्यकीय शिबीरं घेण्यात आली. त्यात एकूण ५९० लोकांची तपासणी केली गेली. ज्यातील २६ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचं समोर आलं. तर, २५ टक्के लोकांना मधुमेह असल्याचं पहिल्यादांच समजलं. कर्करोगाच्या ही तपासण्या केल्या गेल्या. पण, त्याचा अहवाल अजून प्रलंबित आहे. त्यामुळे, या आजारांची तीव्रता पाहता किमान ३५ वयानंतर आरोग्य तपासणी करुन घेणं गरजेचं आहे. ” – डॉ. संतोष रेवणकर, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग

First Published on: April 25, 2019 8:01 PM
Exit mobile version