माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांचे निधन

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांचे निधन

राज्याच्या आदिवासी विभागाचे माजी मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णु सावरा (वय 72) यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर यकृताच्या आजारासाठीचे उपचार सुरू होते. अखेर आज सायंकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

भाजपच्या सरकारमध्ये 2014 साली त्यांना आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद देण्यात आले होते. त्याआधीही त्यांनी 1999 साली युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यातील काळात आदिवासी विभागाचे मंत्रीपद भूषावले होते. 1980 च्या दशकात दोनवेळा आमदारकीच्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर अखेर 1990 च्या दशकात पहिल्यांदा त्यांना आमदारकीचा मान मिळाला. त्याआधीच दोनवेळा त्यांना निसटत्या पराभवाचा अनुभव आला होता. अतिशय संवेदनशील, कर्तव्यदक्ष अशी त्यांची सामाजिक ओळख होती. बॅंकेची मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी 1980 च्या दशकात राजकारणात प्रवेश केला होता. दोन वेळा मंत्रीपद भूषावूनही त्यांच्या स्वभावात अतिशय नम्रपणा होता. तसेच आपल्या स्वभावामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला होता. जनतेचे प्रश्न मांडताना त्यांनी कुपोषणाचा प्रश्न, जिल्हा विभाजन यासारखे विषय अतिशय कुशलतेने हाताळले होते.

विष्णू सावरा यांच्या निधनाने भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला! – देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी अनेक परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे 30 वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला : सुधीर मुनगंटीवार

माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सवरा यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. विष्णू सवरा यांनी  कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तळागाळातील सामान्य माणसाच्या उत्थानासाठी ते आयुष्यभर झटले . विधानसभेत आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी बुलंद होणारा त्यांचा आवाज त्यांचा सहकारी म्हणून मी जवळून अनुभवला आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आदिवासी समाजात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी  कायम परिश्रम घेतले. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीची तसेच एकूणच राजकिय व सामाजिक क्षेत्राची  मोठी हानी झाली असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
 

 

First Published on: December 9, 2020 10:37 PM
Exit mobile version