कोस्टल रोड भुयारी मार्गच्या खोदकामाला ७ जानेवारीपासून सुरूवात

कोस्टल रोड भुयारी मार्गच्या खोदकामाला ७ जानेवारीपासून सुरूवात

कोस्टल रोड

मुंबई कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाचे काम ७ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे. या कामाच्या अंतर्गत दोन भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. जमिनीखालून दोन बोगदे खोदण्याचे काम जानेवारीपासून सुरू करून पुढील १८ महिन्यात या बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबईतील कोस्टल रोडचे काम जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सिलिंक असा १०.५८ किलोमीटरचा हा कोस्टल रोड बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल १२,७२१ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी १३०० कोटी रुपयांची विकास कामे झालेली आहेत, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

कोस्टल रोडवर २.०८२ किलोमीटरचे दोन बोगदे असणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चायना मेड टीबीएम (बोगदा खोदण्याचे मशीन) वापरले जाणार आहे. या मशीनला ‘मावळा’ असे मराठमोळे नाव देण्यात आले आहे. या मशीनचा व्यास १२.१९ मीटर आहे. बोगद्याच्या अंतर्गत व्यास ११ मीटर असणार आहे. बोगद्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व व्यवस्था असणार आहे. बोगद्याजवळ स्काडा सिस्टम कंट्रोल रूम असणार आहे. तसेच, बोगद्यात काही आपत्कालीन घटना घडली तर मुंबई महाललिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, पोलीस, महापालिका, अग्निशमन दल यांना याची माहिती उपलब्ध होणार आहे. नवीन वर्षात ७ जानेवारीला कोस्टल रोडसाठी समुद्राखालून ४०० मिटरचे बोगदे खोदण्याचे काम सुरू होईल, असे आयुक्तांनी सांगितले.


हेही वाचा – कोरोनाला न जुमानता कोस्टल रोडचे काम सुसाट

First Published on: December 21, 2020 6:52 PM
Exit mobile version