अंधेरीतला ‘हा’ ब्रिज कधीही कोसळू शकतो; पालिका-रेल्वेचं दुर्लक्ष!

अंधेरीतला ‘हा’ ब्रिज कधीही कोसळू शकतो; पालिका-रेल्वेचं दुर्लक्ष!

अंधेरीतल्या या ब्रिजची दुरवस्था,कधीही कोसळू शकतो

मंगळवारी अंधेरी स्टेशनवरच्या गोखले ब्रिजचा एक हिस्सा कोसळल्यानंतर आख्ख्या मुंबईत खळबळ माजली. सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर दिवसभर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. हा पूर दुरवस्थेमध्ये असल्याचं नंतर समोर आलं. मात्र, आता अशाच प्रकारे अंधेरी स्थानकावरचाच एक फूटओव्हर ब्रिज गंभीर अवस्थेमध्ये आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ब्रिजच्या खालीच काही झोपड्या आणि फास्ट लोकलचा ट्रॅक आहे. त्यामुळे जर गोखले ब्रिजप्रमाणेच या ब्रिजबाबतही दुर्घटना घडली आणि त्यात जीवित किंवा वित्तहानी झाली, तर त्याची जबाबदारी घेणार कोण? असाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मात्र, याचं सोयरसुतक ना महापालिकेला आहे ना रेल्वे प्रशासनाला. या दोन्ही बाजूंकडून या ब्रिजच्या डागडुजीचा प्रश्न एकमेकांकडे टोलवला जात आहे.

अंधेरीच्या पादचारी पुलाची दुरवस्था

हा पूल सध्या धोकादायक अवस्थेत

अंधेरी येथे पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा मेट्रो स्टेशनला लागूनच एक 70 वर्ष जुना ब्रिज आह. हा ब्रिज सुरुवातीला रुंद होता. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसायचे. मात्र जेव्हा अंधेरी-घाटकोपर मेट्रोसेवा सुरू झाली, तेव्हा हा रुंद असलेला ब्रिज अरुंद करण्यात आला आणि तो फक्त पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात आला. मात्र हा ब्रिज सध्या धोकादायक अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. खालच्या बाजूने पाहिल्यास ब्रिजची झालेली दुरवस्था अगदी सहज लक्षात येऊ शकते. अनेक ठिकाणी ब्रिजचं प्लास्टर निघालेलं आहे. लोखंडी सळ्यांना गंज चढला असून ब्रिजचं लोखंडही गंजलेल्या अवस्थेत आहे. पूर्व आणि पश्चिमेला जाण्यासाठी हा एकमेव ब्रिज आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर या ब्रिजचा वापर करत असतात.

अंधेरीच्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांना गंज

पालिकेची टोलवाटोलवी, रेल्वेला सोयरसुतकच नाही!

दरम्यान, हा ब्रिज पालिकेचा असल्यामुळे ‘माय महानगर’ने जाब विचारण्यासाठी अंधेरीतील पालिकेच्या अधिकाऱ्यांना गाठले. मात्र, ‘आम्ही या ब्रिजच्या दुरुस्तीसाठी ९० लाख रुपये रेल्वेला दिले आहेत’, असं सांगत हात झटकल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याबाबत ‘माय महानगर’ने रेल्वे प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी मात्र, ‘माहिती घेऊनच याबाबत सांगता येईल’ असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे पालिकेचा भाग सोडून रेल्वेने पश्चिम बाजूला असलेला फक्त रेल्वे पुरताच पुलाचा भाग नवीन केल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे आणि पालिका यांच्यातल्या वादात सामान्य मुंबईकरांच्या मानेवर मात्र टांगती तलवार आहे.

पादचारी पुलाचे प्लास्टर निघाले

वाद महत्त्वाचा की मुंबईकरांचा जीव?

७० वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेकडून हा ब्रिज बांधण्यात आला होता. पूर्व आणि पश्चिम बाजूला जोडणारा हा एकमेव पब्लिक ब्रिज आहे. त्यामुळे दोघांनी समन्वय साधून ब्रिज बांधावा. कारण या दोघांच्या वादात सर्वसामान्य लोकांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस कैलास वर्मा यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली. दरम्यान, रेल्वेच्या फास्ट लोकल या धोकादायक पुलाखालूनच जात असतात. त्यामुळे हा जुना पूल कोसळला, तर मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

First Published on: July 4, 2018 5:54 PM
Exit mobile version