कोरोना उपाययोजनांबाबत स्थायी समिती अंधारात

कोरोना उपाययोजनांबाबत स्थायी समिती अंधारात

विविध शुल्कात दरवर्षी ५% दरवाढ करण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड, आयसीयू बेड यांची कमतरता भासते आहे. नागरिकांचे फोन आले, तक्रारी आल्या की मदतीला नगरसेवकांनाच रात्री- अपरात्री धाव घ्यावी लागते. कोरोनाबाबत नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबतची माहिती पालिकेचे ट्रस्टी असलेल्या गटनेते, नगरसेवकांना प्रशासन माहिती न देता अंधारात ठेवत असल्याची तक्रार सर्वपक्षीय गटनेत्यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली.

त्यामुळे अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांनी, कोरोनाबाबत पालिकेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. मात्र यापुढे स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीप्रसंगी आयुक्तांनी मुंबईतील कोरोनाजन्य परिस्थितीबाबत निवेदनाद्वारे माहिती द्यावी,अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. यासंदर्भातील माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत मुंबईतील कोरोनाबाबतची उपाययोजना,
ऑक्सिजन, बेड, रेमडेसीवर इंजेक्शन यांची कमतरता निर्माण होऊन भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना पालिका नेमके काय काय उपाययोजना करीत आहे, याबाबत माहिती स्थायी समितीला माहिती न देता अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही पालिकेवर ताशेरे ओढले.

यावेळी, पालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांनी, कोरोनाबाबत पालिकेने केलेल्या विविध उपाययोजना व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती देऊन प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.


 

First Published on: April 22, 2021 8:10 PM
Exit mobile version