डोळ्यांवर उपचार करणारे भारतातील पहिले मशीन ‘नायर’मध्ये

डोळ्यांवर उपचार करणारे भारतातील पहिले मशीन ‘नायर’मध्ये

४० हून अधिक शस्त्रक्रिया एकाच मशीनमधून शक्य, डोळ्यांवर उपचार करणारे भारतातील पहिले मशीन नायर हॉस्पिटलमध्ये

मुंबई महानगरपालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये आता डोळ्यांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करणं सहज सोपं होणार आहे. नुकतंच डोळ्यांच्या विविध विकारांवर ४० हून अधिक शस्त्रक्रिया करणारे भारतातील पहिले मशीन नायर हॉस्पिटलमध्ये दाखल झालं आहे. या मशीनमुळे मोतीबिंदू दृष्टीपटलावरील शस्त्रक्रिया, ग्लोकोमा, लेझर असे अनेक उपचार या एकाच मशीनने करणं शक्य होणार आहेत. डोळ्यांच्या विविध विकारांवर उपचार करणारी ही भारतातील पहिलीच मशीन असल्याचे नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

खासगी हॉस्पिटलमध्ये ही सुविधा नसून पालिका हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना नेत्रविकारातील कोणते उपचार सहज उपलब्ध होणार असल्याचे नायर हॉस्पिटलमधील नेत्रविभाग प्रमुख प्रा. डॉ. सरोज सहदेव यांनी सांगितले.

डोळे विकारातील अद्यापपर्यंत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ग्लोकोमा शस्त्रक्रिया आणि इतरही सर्जरी करणाऱ्या मशीन्स आहेत. पण, या सर्व सर्जरी एकाच यंत्रात नसल्याने एकाहून अधिक मशीनचा वापर करावा लागत होता. या सर्व शस्त्रक्रियांसहीत नेत्रविकारातील वेट्रो रेटिना शस्त्रक्रिया महत्वाची मानली जाते. या मशीनमध्ये वेट्रो रेटिना आणि लेझर सुविधाही समाविष्ट करण्यात आली आहे.

सव्वा कोटी रुपये किंमतीची ही मशीन आहे. या मशीनमुळे नायर हॉस्पिटलमध्ये नेत्रविभाग अधिक बळकट झाला आहे. नायर हॉस्पिटलमध्ये दररोज ५० ते ६० रुग्ण दृष्टीपटलाच्या समस्या घेऊन येतात. यातील किमान दहा जणांना वेट्रो रेटिना सर्जरीची आवश्यकता लागते. या मशीनमुळे हे उपचार नेत्र रुग्णांना सहज मिळणार आहेत.

वेट्रो रेटिना सर्जरी – वेट्रो रेटिना सर्जरीमध्ये तज्ज्ञ असलेल्या नायर हॉस्पिटलच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. सरोज सहदेव यांनी याबाबत माहिती दिली. कित्येक वेळा दृष्टीपटलावर पडदा येतो. अशावेळी शस्त्रक्रिया करून दृष्टीपटल बाहेरून बसवू शकत नाही. अशा स्थितीत डोळ्यातील व्हिट्रस काढून रेटिनावर उपचार केले जातात. कमजोर असलेल्या भागावर लेझर ट्रीटमेंटही करावी लागते. त्यामुळेच दृष्टीपटल एकाच जागी स्थिर बसू शकते. ही क्लिष्ट शस्त्रक्रिया या मशीनमुळे सहज होणार आहे.

First Published on: February 26, 2020 9:28 PM
Exit mobile version