विधान परिषदेची एक जागा आरपीआयला सोडण्याचे फडणवीसांचे आश्वासन

विधान परिषदेची एक जागा आरपीआयला सोडण्याचे फडणवीसांचे आश्वासन

राज्यात विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. ९ जागांपैकी भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. यातील एक जागा भाजपने आरपीआयला सोडावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती. याबद्दल त्यांनी आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली. या भेटीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष असलेल्या रिपाईला एक जागा सोडण्याचे आश्वासन दिल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाने भाजपला कायम साथ दिली असल्याने मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेची एक जागा देणे आवश्यक असून, या जागेवर रिपाइंच्या एका पदाधिकऱ्यास नियुक्त करता येऊ शकते असे रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यावर भाजपला केवळ ४ जागा मिळणार असून, भाजप च्या राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे या जागांसाठी चर्चेत आहेत.  त्यात ज्येष्ठ नेत्यांची अधिक नावे आहेत तरी सुद्धा चांगला मित्र पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला एक जागा सोडण्याबाबत निश्चित विचार करू असे आश्वासन यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांना दिल्याचे आठवले म्हणालेत.

माजी मंत्री विधान परिषदेसाठी इच्छुक

दरम्यान सध्या भाजपमध्ये विधान परिषदेवर जाण्यासाठी एक दोन नव्हे तर पाच माजी मंत्री इच्छुक आहेत. यामध्ये भाजप सरकारच्या काळात असलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच आघडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आणि आता भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत.

असे आहे पक्षीय बलाबल

सध्या विधान सभेचे पक्षीय भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत.

First Published on: May 6, 2020 5:49 PM
Exit mobile version