फटाक्यांतील रसायने ठरतायेत जीवघेणे

फटाक्यांतील रसायने ठरतायेत जीवघेणे

fire-crackers

प्रतिनिधी: दिवाळ सणातील छोट्या मुलांची सर्वात आकर्षणाची गोष्ट म्हणजे फटाके. पण छोट्या मुलांकडून हाताळले जाणार्‍या फटाक्यात सर्वात विषारी केमिकल्सचा वापर करण्यात येतो. हे रसायन आरोग्यासाठी सर्वाधिक घातक आहेत. मुर्क्युरी, लीड आणि सल्फर यांसारख्या केमिकल्सचा मोठ्या प्रमाणावर या फटाक्यांमध्ये वापर होत असल्याचे आवाज फाऊंडेशनच्या अहवालातून समोर आले आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडूनही फटाक्यांमधील केमिकल्सची चाचणी करण्यात येते. पण आजवर एकही अहवाल एमपीसीबीमार्फत जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेमार्फतही मर्क्युरी आणि लीडचा समावेश सर्वात घातक अशा दहा केमिकल्समध्ये करण्यात आलेला आहे. पर्यावरण नियमावली १९८९ नुसार आरोग्यासाठी घातक अशा केमिकल्सची निर्मिती, साठवणूक आणि आयात करणे यांचा सामावेश करण्यात आला आहे. फटाक्यांमध्ये वापरण्यात येणारे चारही केमिकल्स हे दाट लोकसंख्येच्या भागात वापरण्यासाठी घातक आहेत. विशेषतः समुद्रनजीक असलेल्या परिसरासाठी हे केमिकल्स आणखी घातक ठरतात. सल्फरचा पाण्याशी संबंध आल्याने सल्फर एसिड तयार होते. तर मर्क्युरीचा परिणाम हा माशांवर आणि माशांच्या आहारातून माणसांवर होतो. मर्क्युरीच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामामुळे मृत्यूही ओढावू शकतो अशी जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शिका आहे. त्यामुळेच मर्क्युरी, लीड, सल्फरचा वापर करण्यात आलेल्या फटाक्यांवर बंदी आणावी अशी मागणी आवाझ फाऊंडेशनमार्फत करण्यात आली आहे.

फटाक्यांमध्ये वापरण्यात येणारे केमिकल्स स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर धुर आणि आरोग्यास घातक असे वायु प्रदुषण निर्माण करतात. महत्वाचे म्हणजे एका विशिष्ट अशा दिवाळीच्या कालावधीतच मोठ्या प्रमाणावर हे केमिकल्स आपण शरीरामध्ये श्वसनाद्वारे घेत असतो.आवाझ फाऊंडेशनने यंदा ३६ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी एका खासगी प्रयोगशाळेत केली. त्यामध्ये मुख्यत्वेकरून कोणत्या केमिकल्सचा वापर करण्यात आला आहे याची चाचणी करण्यात आली. प्रयोगशाळेतील चाचणीत दोन प्रकारच्या चाचणीचा वापर करण्यात आला होता. याआधी २०१५ मध्ये आवाझ फाऊंडेशनने चाचणी केली होती. त्यामध्येही मर्क्युरीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आढळले होते.

फटाक्यांसाठी केमिकल्सचा असा होतो वापर

फटाक्यांमध्ये मुख्यत्वेकरून स्फोटक, फ्लेमेबल मटेरिअल याचा वापर हा मोठ्या आवाजासाठी, प्रकाशासाठी आणि धुरासाठी करण्यात येतो.भारतात बॅरिअम नायट्रेट आणि पोटॅशियम नायट्रेटचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यासोबतच चारकोल आणि सल्फरचाही वाापर होतो. या केमिकल्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर उष्णता आणि प्रकाश निर्माण करणे शक्य होते. फटाक्यांमध्ये अतिरिक्त स्पार्कल आणि फ्लॅश तसेच इफेक्टसाठी मॅग्नेशिअम पॉवडर, अ‍ॅल्युमिनिअम पॉवडर आणि टिटानिअमचा वापर होतो.रंग आणि स्पेशल इफेक्ट्ससाठी खालील केमिकल्सचा वापर होतो.

सो़डिअम – सोनेरी आणि पिवळ्या रंगासाठी
पोटॅशिअम नायट्रेट – विषारी धूर निर्माण होतो
मॅग्नेशिअम – सफेद रंगाच्या ज्वाला तयार होतात
टिटानिअम – स्पार्कसाठी वापर
झिंक – धुरासाठी वापर होतो
कॉपर – निळ्या रंगासाठी वापर
सल्फर – रंगीबेरंगी फवारे निर्माण करण्यासाठी

First Published on: November 10, 2018 4:01 AM
Exit mobile version