यूपीत तयार होणाऱ्या बनावट मास्कची मुंबईत विक्री

यूपीत तयार होणाऱ्या बनावट मास्कची मुंबईत विक्री

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क लावणे गरजेचे झाले आहे. मास्क हा सध्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील घटक झाला आहे. विविध प्रकारचे रंगीबेरंगी मास्क बाजारात उपलब्ध आहेत. अनेक बड्या कंपन्या मास्कच्या व्यवसायात उतरल्या असून या कंपन्यांच्या नावाचा वापर करून बनावट मास्क तयार करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अशाच एका टोळीचा छडा लावून बनावट मास्क तयार होत असलेला कारखानाच उध्वस्त केला आहे.

उत्तर प्रदेशातील गाजियाबाद शहरात एका नामांकित कंपनीचे नाव लावून हुबेहूब बनावट मास्कची निर्मिती करणारा कारखाना उध्वस्त करण्यात आला असून या कारखान्याच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील लोअर परळ या ठिकणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने टेम्पो भरून ‘विनस’ या कंपनीचे एन-९५ बनावट मास्कचा साठा पकडण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना विनस कंपनीच्या एन-९५ मास्क हे उत्तर प्रदेशातील गाजियाबाद या ठिकाणी तयार होत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांना मिळाली. या माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक खोत, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन भारती, पो. अंमलदार शिवाजी जाधव, भास्कर गायकवाड आणि पथक यांनी गाजियाबाद येथे जाऊन बनावट मास्क तयार करण्याचा कारखान्याचा शोध घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विनस कंपनीचे एन-९५, व्ही-४१० मॉडेल चे तयार केलेले मास्क, मास्क तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, मास्क तयार करण्यात येणारी डेल्टा कंपनीची मशीन, प्रिंटिंग मशीन जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी कारखाना मालक मोहम्मद सोहेल मोहम्मद इद्रिस अन्सारी (३१) याला अटक करण्यात आलेली आहे.

गाजियाबाद येथे तयार होणारे बनावट मास्क हे भारतात मोठ्या प्रमाणात मागणीनुसार पुरवठा करण्यात येत होता. तसेच राज्यातील ठाणे, नवीमुंबई, मुंबई आणि पालघर इत्यादी ठिकाणी या बनावट मास्कची मोठी मागणी होती अशी माहिती कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली.

 

First Published on: October 31, 2020 1:30 PM
Exit mobile version