वाशीतील श्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवाशांची दिशाभूल, २.५ एफएसआयचे खोटे स्वप्न

वाशीतील श्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवाशांची दिशाभूल, २.५ एफएसआयचे खोटे स्वप्न

vashi sector 10

वाशी सेक्टर १० मधील श्रद्धा अपार्टमेंट गेल्या तीस वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यातील सहा इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून यातील रहिवासी जुईनगरमधील संक्रमण शिबिरात रहात आहेत. मात्र त्यांच्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे आता सिडकोनेच या इमारती नव्याने बांधाव्यात, अशी मागणी या अपार्टमेंटच्या सदस्यांनी वाशी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

वाशीतील श्रद्धा अपार्टमेंटमध्ये २३ इमारती आहेत.या इमारती अतिशय जीर्ण झाल्या आहेत. यापैकी सहा इमारतींमधील रहिवाशांनी या इमारती रिकाम्या केल्या आणि त्यांची रवानगी संक्रमण शिबिरात करण्यात आली. मात्र आजपर्यंत या इमारतींची पुनर्बांधणी झालेली नाही. या इमारतींच्या पुनर्बांधणीचा विषय गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे, मात्र पुनर्बांधणीला हिरवा कंदील मिळत नसल्याने हा विषय रखडला आहे. शहरातील धोकादायक ठरलेल्या आणि पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतींकडे सध्या अनेक बांधकाम व्यवसायिक लक्ष ठेवून आहेत.

या अपार्टमेंटमध्येही पुनर्बांधणीचे वारे वाहू लागले आहेत. मात्र पुनर्बांधणीच्या कामात पारदर्शकता नसल्याने काही सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. पारदर्शकता ठेवून काम करावे किंवा या इमारती सिडकोने उभारल्या असल्याने सिडकोनेच या इमारतींचा विकास करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. व्यावसायिकांकडून रहिवाशांची फसवणूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी सिडकोने आमचा पुनर्विकास करावा आणि नियमानुसार मिळणार्‍या एफएसआयमध्ये आम्ही समाधान मानून घेऊ, असे येथील सदस्य सुरेश शिंदे यांनी यावेळी सांगितले.सन १९९८ मध्ये श्रद्धा अपार्टमेंटमधील ७ बिल्डिंग सिडकोने धोकादायक ठरवून येथील रहिवाशांचे जुईनगर येथील संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर केले. त्या वेळी सिडको अधिकारी व्ही. राधा यांनी सिडकोच्या माध्यमातून पुनर्विकासाचा प्रस्ताव ठेवला होता. तो रहिवाशांनी अमान्य केला. त्यानंतर एका व्यावसायिकाने अनधिकृतपणे समिती स्थापन केली.

या समितीला न्यायालयाने बेकायदा ठरविले आहे. तरीही या समितीने १९ ऑक्टोबर रोजी व त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी तातडीची सभा बोलावली. या दोन्ही सभांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र बांधकाम व्यावसायिकाने श्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवाशांची दिशाभूल चालविली असून २.५ च्या एफएसआयचे खोटे स्वप्न रहिवाशांना दाखविले जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अ‍ॅड् राहुल बर्गे, विलास सकपाळ आदी सदस्य हजर होते.

First Published on: October 29, 2018 2:40 AM
Exit mobile version