शुल्लक वादातून पत्नीने घेतले जाळून; निष्पाप चिमुरडीचाही मृत्यू

शुल्लक वादातून पत्नीने घेतले जाळून; निष्पाप चिमुरडीचाही मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

पती–पत्नीमध्ये कौटूंबिक वाद झाल्याने संतप्त पत्नीने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. दरम्यान यावेळी आगीचा अचानक भडका उडाल्याने नवरा बायकोसह दोन वर्षाची चिमुरडीही आगीत होरपळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना भिवंडी शहर महानगरपालिका हद्दीतील भाडवड येथील एका चाळीत राहणाऱ्या मलिक कुटुंबात घडली आहे.

निष्पाप चिमुरडीचा मृत्यू

या घटनेत उपचारादरम्यान मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. पत्नी सुष्मिता मलिक (२८) आणि सुब्रोश्री मलिक (२ वर्षे) असे उपचारादरम्यान मृत पावलेल्या मायलेकींची नावे आहेत. तर रतीकांत मलिक (३५) हा मृत्यूशी झुंज देत आहे. रतीकांत मलिक हा मूळचा ओरिसा राज्यातील असून तो भिवंडीत यंत्रमाग कारखान्यात बीम भरण्याचे काम करतो. भिवंडीच्या भादवड येथील पारसपाड्यात शत्रू तरे यांच्या चाळीतील खोलीत पत्नी आणि दोन मुलींसह गेल्या आठ वर्षांपासून राहत आहे. शुक्रवारी पतीला सुट्टी असल्याने त्याने रात्रीच्या सुमाराला घरी जेवणासाठी मटन आणले होते. त्यावेळी दोघेही स्वयंपाक करण्यात गुंतलेले असताना अचानक नवरा बायकोमध्ये कौटुंबिक वाद निर्माण झाला. वादात संतप्त झालेल्या सुष्मिता हिने जवळच असलेल्या कॅनमधील रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून पेटवून घेतले.

पतीची मृत्यूशी झुंज

त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाल्याने घटनेत नवराबायकोसह मुलगी देखील भाजली. या आगीत सुश्मिता ९८ टक्के, रतीकांत २५ टक्के तर मुलगी सुब्रोश्री ही ८० टक्के जळाली. शेजाऱ्यांनी या तिघांनाही उपचारासाठी प्रथम स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र या तिघांचीही प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी पती-पत्नीला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात तर मुलीला केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. या तिघांच्या गंभीर जखमांवर उपचार सुरु असताना आई सुष्मिता आणि मुलगी सुब्रोश्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या जळीत कांडाची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास एपीआय जी. जे. जैद करीत आहे.

First Published on: March 9, 2019 10:23 PM
Exit mobile version