सहकार आयुक्त सोनी निलंबित

सहकार आयुक्त सोनी निलंबित

राज्य सरकारने सुरू केलेली ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना २०१९’ योजना भलत्याच कारणाने चर्चेत आली असून या कर्जमाफीसाठी तयार केलेली वेबसाइट लिंक ही कँडीक्रश या मोबाईल गेम वर जात असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराचा ठपका प्रभारी सहकार आयुक्त सतिश सोनी यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

सतीश सोनी यांच्याकडे गेली काही महिने या पदाचा अतिरिक्त पदभार होता. त्यांच्या निलंबनानंतर नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांच्याकडे या पदाचा पूर्णवेळ कारभार दिला आहे. अशी चुकीची लिंक ही नजरचुकीने दिली असली जाऊ शकेल किंवा सरकारच्या बदनामीचा कट यामागे असाण्याची शक्यता सोनी यांच्या निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आली आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना २०१९ साठी सहकार आयुक्तांनी दोन पत्रे तयार केली होती. या पत्रामध्ये योजनेच्या अचूक वेबसाइटची लिंक त्यांनी कृषी खात्याला दिलेली होती. मात्र ही लिंक चुकीची असल्याचे निदर्शनास आले. ती लिंक ओपन केली असता कँडिक्रश हा मोबाईल गेम उघडला जात असल्याचे लक्षात आल्याने कृषी खात्याने याबाबत सरकारला कळविले होते.

चुकीमुळे सरकारची बदनामी
राज्यसरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सोनी यांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित होते. तसेच कृषी खात्याला लिंक पाठविताना त्याची खात्री करून घेणे आवश्यक होते. त्यांनी केलेली ही चूक अनावधानाने झाली नसून हेतुुपुरस्सर झाली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे या आदेशात म्हटले आहे. तसेच त्यांच्या या चुकीमुळे योजनेची बदनामी झालीच शिवाय सरकारला विविध पातळीवर खुलासे करावे लागले. सहकार आयुक्तांनी त्यांच्या कामात अक्षम्य हलगर्जीपणा, दुर्लक्ष व बेजबाबदारपणा दाखविला आहे, याबाबत त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना २१ जानेवारीपासून निलंबित करण्यात येत आहे, असे या आदेशात म्हटले आहे.

First Published on: January 23, 2020 1:38 AM
Exit mobile version