सर्पदंश मृत्यूप्रकरणी साखळी उपोषण

सर्पदंश मृत्यूप्रकरणी साखळी उपोषण

सर्पदंश मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आदिवासी आधार फाऊंडेशनने तहसील कचेरीसमोर साखळी उपोषण सुरु केले

वाडा तालुक्यातील डाहे गावातील रमेश गवळी यांचा सर्पदंश झाल्याने त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून तातडीने ठाणे येथे पुढील उपचारासाठी नेण्याची गरज होती. मात्र वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 17 नोव्हेंबरला घडली होती. ही घटना आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणारी असून या घटनेची सखोल चौकशी करावी. तसेच वाडा तालुक्यात आरोग्य यंत्रणा भक्कम करावी या मागणीसाठी आदिवासी आधार फाउंडेशनने वाडा तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.

वाडा तालुक्यात आरोग्य सेवा देणारे एकमेव सरकारी ठिकाण म्हणजे वाडा ग्रामीण रुग्णालय असून त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. या रुग्णालयात 17 नोव्हेंबरला शेतावर काम करीत असलेल्या रमेश गवळी यांना सर्पदंश झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपस्थित डॉक्टरांनी आटोकाट उपचार केले. मात्र पुढील उपचारासाठी ठाणे येथे रुग्णाला जाण्यासाठी एकही रुग्णवाहिका न मिळाल्याने रमेश यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका जागोजागी पेरलेल्या असतांनाही एकही रुग्णवाहिका उपलब्ध न होणे हे संतापजनक असून याविरोधात आदिवासी आधार फाउंडेशन पुढे आली आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर ग्रामीण रुग्णालयात सफल उपचार का होऊ नयेत आणि रुग्णवाहिका उपलब्ध का झाली नाही याची सखोल चौकशी करावी, वाडा ग्रामीण रुग्णालयाचे सुसज्ज अशा उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवून प्रत्येक ठिकाणी तज्ञ वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा, शिवाय मृत रमेश गवळी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशा प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी आधार फाउंडेशनने साखळी उपोषण सुरू केले आहे.

आमच्या मागण्या सर्वसामान्य व गोरगरीब आदिवासी बांधवांच्या हिताच्या असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे उपोषण सुरूच राहील. शिवाय ग्रामीण रुग्णालयाच्या असुविधांवर सतत आमचे लक्ष असेल असा इशारा संस्थापक अध्यक्ष कल्पेश ठाणगे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी दिला आहे.

First Published on: November 28, 2019 5:29 AM
Exit mobile version