रेल्वे प्रवाशांमध्ये ‘फटका गँग’ दहशत

रेल्वे प्रवाशांमध्ये ‘फटका गँग’ दहशत

उपनगरीय लोकल गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना टार्गेट करणारी ‘फटका गँग’ पुन्हा एकदा सक्रिय झाली असून या गँगने रेल्वेच्या हद्दीत अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. या गँगने एकट्या वांद्रे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत एकाच दिवसात आठ प्रवाशांना लक्ष्य केले. या टोळ्या मुंबईसह ठाणे ,कल्याण , नवी मुंबई मध्ये सक्रिय आहेत. या भागात या गँगने हैदोस घातला असून गेल्या चार दिवसात या टोळ्यांनी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांच्या हद्दीत सुमारे १५ पेक्षा अधिक प्रवाशांना आपले लक्ष्य बनवले. या गँगच्या हल्ल्यात प्रवाशी गंभीररीत्या जखमी होत असून या टोळीच्या जीवघेण्या कृत्यामुळे प्रवाशांना दररोज आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या सर्व घटनांना रेल्वे पोलीस विशेष गांभीर्याने घेत नसल्यामुळे या टोळ्यांचे धाडस वाढले आहे.

या टोळीने ३ ऑक्टोबर रोजी एकाच वेळी आठ प्रवाशांना टार्गेट केले. या प्रवाशांमध्ये महिलाचा देखील समावेश आहे. गोरेगाव येथे राहणारे अमित पताजी यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून ३ ऑक्टोबर रोजी दुपारी गोरेगाव ते लोअर परळ दरम्यान ट्रेनच्या दरवाजात उभे राहून प्रवास करीत असताना माहीम खाडीपासून थोड्या अंतरावर ट्रेन हळू होताच खांबावर उभे असलेल्या या टोळीने अमित यांच्यावर हल्ला करून त्यांच्या वरच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरी केला. त्यानंतर या टोळीने अर्ध्या तासाच्या अंतराने त्याच ठिकाणी माहीम येथे राहणार्‍या यास्मिन अहमद या महिलेला टार्गेट करून धावत्या ट्रेनमधून त्यांच्या खांद्यावरील पर्स खचून पोबारा केला. त्याच दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मालाड मालवणी येथे राहणार्‍या चांदणी किरमनी या फटका गँगच्या शिकार झाल्या.

या चोरट्यांंनी चांदणी यांचा महागडा फोन चोरी केला. भाग्यश्री निजाई या देखील माहीममध्ये राहणार्‍या असून त्या वांद्रे ते माहीम प्रवास करीत असताना त्याच ठिकाणी चोरट्यांनी त्यांच्या गळयातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. जुहू येथे राहणारे विजय सकपाळ यांचा मोबाईल फोन त्याच जागेवर खेचण्यात आला. मानखुर्द येथील अजित खान या तरुणाचा फोन खेचण्यात आला. धारावीतील मेहमूद शेख यांचा मोबाईल फोन वांद्रे रेल्वे स्थनकावरील फलाट क्रमांक ३ वर बळजबरीने चोरण्यात आला. वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना एकाच दिवशी घडल्या असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या प्रकरणी फटका गँगच्या एका सदस्याला शनिवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

या फटका गँगचा फटका केवळ पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना न बसता सेंट्रल रेल्वे प्रवाशांना देखील बसत आहे. कुर्ला, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील या प्रकारच्या अनेक घटना या आठवड्यात घडल्या असून यामध्ये लांबपल्ल्याच्या गाडीतील प्रवाशांचाही समावेश आहे. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यविहार, विक्रोळी, नाहूर या ठिकाणी फटका गँग सक्रिय असून ठाणे या ठिकाणी हि टोळी मुलुंड आणि ठाण्याचा दरम्यान सक्रिय असून कळवा, मुंब्रा ही ठिकाणे या टोळ्यांचे ठिकाण आहेत. कल्याणच्या हद्दीत हि टोळी शहाड, आंबिवली, उल्हासनगर, विठलवाडी आणि अंबरनाथ या ठिकाणी सक्रिय आहे. हार्बर मार्गावर या टोळ्या वडाळाच्या हद्दीत सक्रिया आहेत. या घटनांवर आळा बसवण्यासाठी तसेच या टोळीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून काय उपाय करण्यात आले याबाबत चौकशी करण्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्तांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तसेच सेंट्रल रेल्वे पोलिसांना उपआयक्त नसल्यामुळे त्याचा चार्ज पश्चिम रेल्वे पोलीस उपायुक्त पुरषोत्तम कराड यांच्याकडे असून ते देखील सुट्टीवर असल्यमुळे त्यांनी याबाबत काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

अशा करतात चोर्‍या

पश्चिम मार्गावरील वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहीम खाडीपासून थोड्या अंतरावर ’फटका गँग’चा अड्डा असून या ठिकाणी असलेल्या एका खांबावर या टोळीचे काही सदस्य हातात काठी, रॉड घेऊन खांबाच्या आड लपून बसतात. ट्रेन येताच हे धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांना टार्गेट करून त्यांच्या हातावर काठी किंवा रॉडचा फटका मारून प्रवाशाच्या हातातील वस्तू खाली पाडतात, त्यानंतर खाली उभे असलेले टोळीचे इतर सदस्य खाली पडलेली वस्तू (मोबाईल, बॅग,पर्स ) घेऊन पोबारा करतात.

First Published on: October 8, 2018 1:07 AM
Exit mobile version