घाटकोपरमध्ये तेलाच्या दुकानावर एफडीएचा छापा

घाटकोपरमध्ये तेलाच्या दुकानावर एफडीएचा छापा

दुय्यम दर्जाच्या तेलाची साठवणूक, वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर आणि ब्रँडेड तेलाचे लेबल पत्र्याच्या डब्यांवर लावण्यात येत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने २५ नोव्हेंबरला घाटकोपर येथील तेलाच्या दुकानावर छापा घातला. या छाप्यामध्ये १४१८.६ किलोचे १ लाख ८२ हजार ९६९ रुपये किमतीचे सात प्रकारचे तेल जप्त करण्यात आले.

घाटकोपर पश्चिमेकडील एलबीएस मार्गावरील मौलाना चाळीमध्ये असलेल्या अंबिका ऑईल डेपो या दुकानामध्ये वापरलेले तेल जुन्या डब्यांमध्ये भरून विक्री करण्यात येत असल्याची माहिती एफडीएच्या झोन ८ च्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार एफडीएच्या आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकले, सह आयुक्त श्रीकांत केंकरे यांच्या नेतृत्त्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस. सावंत, आर. बी. पवार यांनी २५ नोव्हेंबरला कारवाई केली. अंबिका ऑईल डेपोमध्ये घातलेल्या छाप्यामध्ये सात प्रकारचे तेल जप्त करण्यात आले. यामध्ये माली ब्रँडचे ८८.४ किलोग्रॅम वजनाचे २० हजार ६२७ किमतीचे नारळ तेल, सरगम ब्रँडचे ३४३.४ किलोचे ४६ हजार १३० वजनाचे शेंगतेल, बन्सीवाला ब्रँडचे २०८.४ किलोचे २७ हजार ९९४ किंमतीचे राईचे तेल, लायन ब्रँडचे वनस्पती डालडा ७७८.४ किलोचे ४६ हजार १३० किमतीचे उत्पादन तसेच सुट्ट्या स्वरुपातील तेलही जप्त करण्यात आले. जप्त केलेला माल १४१८.६ किलो असून, त्याचे बाजार मूल्य १ लाख ८२ हजार ९६९ रुपये इतके आहे.

नुकत्याच झालेल्या दिवाळीदरम्यान एफडीएने राज्यभरात केलेल्या कारवाईमध्ये ४८ लाख ४४ हजार ५३२ रुपये किमतीचे खाद्यतेल, तूप, वनस्पती जप्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घाटकोपर येथील ऑईल डेपोवर केलेली कारवाई महत्त्वपूर्ण ठरत आहे.

First Published on: November 26, 2020 6:34 PM
Exit mobile version