आमदारांचा उपोषणाचा फार्स निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच

आमदारांचा उपोषणाचा फार्स  निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच

Shahapur

वार्ताहर:- शहापूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लागावीत म्हणून आमदार पांडुरंग बरोरा यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले. मात्र त्यामुळे शहापूर तालुक्यात ते चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्या नावापुढे सातत्याने कार्यसम्राट म्हणून उपाधी लावणारे विद्यमान आमदार बरोरा यांना उपोषणासाठी बसावे लागले, कारण येणार्‍या निवडणुकीत कोणताही मुद्दा त्यांच्याकडे नाही. अनेक कामे आधीच्या आमदारांनी सुरू केली होती त्यांची सांगता बरोरा यांच्या काळात झाली. त्याचे श्रेय स्वत: घेण्याशिवाय यांनी काहीही केलेले नाही, अशी चर्चा शहापुरात रंगली आहे. शहापूर आणि वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, पावसाअभावी करपून गेलेल्या शेतीचे पंचनामे करावेत, त्याची भरपाई शेतकर्‍यांना तातडीने द्यावी, भावली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन संपूर्ण शहापूर तालुका टँकरमुक्त करावा, त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील खेळाडुंसाठी क्रीडासंकुल मंजूर करून त्यासाठी खर्डी येथील महसूलची जागा तातडीने हस्तांतरित करावी, तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालये एकत्र आणण्यासाठी 5 कोटी रुपये खर्चून प्रशासकीय भवनाची निर्मिती करावी, त्यासाठी लागणारी जलसंपदाची जागा उपलब्ध करून द्यावी, अ‍ॅन्युटी हायब्रिटमधून मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत. हे महत्त्वाचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे बरोरा यांनी जाहीर केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी फोनवर आश्वासन देताच चार दिवसातच हा उपोषणाचा फार्स रद्द करण्यात आला.

स्वत:ला कार्यसम्राट अशी उपाधी लावणारे बरोरा आणि त्यांच्या समर्थकांनी मागील चार वर्षांत विकासरत्न, कार्यसम्राट या शब्दांचा इतका चुथाडा केला की आता आपली निष्क्रियता लपवण्यासाठी उपोषण करावे लागले. शहापूर विधानसभा मतदारसंघ हा खासदार कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. त्यांच्या कार्यपद्धतीने ते महाराष्ट्र राज्यातील मंत्रीमंडळातून लोकहिताची कामे मार्गी लावतात, असे शहापूरवासीयांचे मत आहे. याचा फायदा घेत अनेकविध कामांचा नारळ फोडून फोटो काढण्याचा कार्यक्रम बरोरा यांनी अतिउत्साहात केला. मात्र उद्घाटनानंतर सदर विकासकामांचा पाठपुरावा न केल्यामुळे अनेक कामे मार्गी लागलीच नाहीत. याचा परिणाम कार्यसम्राट म्हणून घेणार्‍या आमदाराचे मतदारसंघात हसे झाले. याची जाणीव होताच बरोरा समर्थकांच्या डोक्यातून उपोषणाची सुपीक कल्पना निघाली, अशी चर्चा शहापुरात रंगली आहे.

मागण्या मान्य झाल्याखेरीज उपोषण सुटणार नाही, असे ठामपणे सांगणारे बरोरा यांनी चार दिवसातच उपोषण मागे घेतले. प्रिंट-मीडिया, इलेक्ट्रॉनिक-मीडिया, सोशल-मीडिया, बॅनरबाजीने उपोषण हायटेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही नेहमीची कार्यकर्ते मंडळी सोडता या उपोषणाकडे कुणीही ढुंकून पहिले नाही. याची जाणीव झाल्यानेच चार दिवसांत उपोषण गुंडाळण्यात आले. तेही भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून आमदारांसोबतही फोनवरच बोलणे करून दिले. त्यानंतर आमदारांनी लगेच उपोषण सोडले. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत राष्ट्रवादीचा हात सोडून बरोरा भाजपचे कमळ हाती धरणार, अशी चर्चा आता शहापुरात रंगली आहे.

2014 चे इलेक्शन संपल्यावर पहिल्याच अधिवेशनात स्वत:ला कार्यसम्राट दाखवून देण्यासाठी आधीच इतरांनी मंजूर केलेल्या अनेक कामांचे श्रेय विद्यमान आमदारांनी स्वत:च्या नावाने खपवले. 2014/15 च्या बजेटमध्ये 15 वर्षे प्रलंबित असलेला आबिटघर-साठेपाडा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आदिवासी विकास मंत्री सवरा यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. याचे श्रेय मात्र विद्यमान आमदारांनी स्वत: घेतले. उपोषणाचा फार्स करून मतदारांची दिशाभूल करण्याचा बरोरा यांनी केविलवाणा प्रयत्न केला. त्यातही ते अपयशीच ठरले आहेत.
– संतोष विष्णू साठे, प्रवक्ता, आदिवासी युवा संघटना, महाराष्ट्र राज्य.

First Published on: November 12, 2018 1:29 AM
Exit mobile version