भाजपाच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – प्रवीण दरेकर

भाजपाच्या नेत्यांची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे यांचे निवेदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांविरोधात सोशल मीडियातून सुरू असलेल्या बदनामीबरोबरच राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या दबावाखाली भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे व अत्याचार केले जात आहेत. राजकीय आशिर्वादाने विकृत मनोवृत्तीच्या पेड गॅंग सुरू आहेत, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मुंबई शहराध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार संजय केळकर आणि ठाणे शहराध्यक्ष व आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची आज भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देत पोलिसांकडून होणारे अत्याचार थांबविण्याबरोबरच बदनामी करणाऱ्या समाज कंटकांविरोधात कारवाईची मागणी केली. संकटकालीन परिस्थितीत सोशल मिडियाच्या माध्यमातून वातावरण गढूळ होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहनही दरेकर यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रमुख नेत्यांविरोधात फेसबूक, व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून गलिच्छ भाषेत व चित्राच्या माध्यमातून मारहाणीच्या धमक्या, धर्म व देव-देवतांची टिंगलटवाळी, साधू-संतांविषयी अत्यंत हीन मजकूर सोशल मिडियातून पसरविला जात आहे. मात्र, त्याविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. त्याउलट भाजपाच्या कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारी दाखल करुन त्यांना मारहाण करुन दहशत निर्माण केली जात आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

महाविकास आघाडीतील मंत्री, आमदार यांच्याकडून ठाणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो. त्यानंतर भाजपा व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांना घरातून उचलून नेऊन मारहाण केली जात आहे. तसेच त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जातात. या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली.

First Published on: May 5, 2020 9:43 PM
Exit mobile version