आता सेंट जॉर्जच्या रुग्णांनाही मिळणार सिटी स्कॅनची सुविधा

आता सेंट जॉर्जच्या रुग्णांनाही मिळणार सिटी स्कॅनची सुविधा

सिटी स्कॅन मशीन (प्रातिनिधिक चित्र)

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील सिटी स्कॅनची सुविधा अखेर सुरू झाली आहे. शुक्रवार, २१ जूनपासून ही सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन मशीन नसल्यामुळे रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रिटमेंट घ्यावी लागत होती. आता सेंट जॉर्जमध्येच ही सुविधा सुरू झाल्यामुळे येथील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

सेंट जॉर्ज हॉस्पिटल, मुंबई

तांत्रिक कारणामुळे सुविधा लांबली 

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन मशीनची सुविधा सप्टेंबर २०१७ सुरू करण्यात येईल, असे हॉस्पिटल प्रशासनाकडून यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा लांबली. अखेर शुक्रवारपासून रुग्णांना सिटी स्कॅन करण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज भासणार नसल्याची माहिती सेंट जॉर्जचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली.

सरकारने ७ कोटींचा निधी दिला 

राज्यभरातील रुग्ण सेंट जॉर्जमध्ये उपचारासाठी येतात. परंतू, गेल्या कित्येक वर्षांपासून हॉस्पिटलमधील सिटी स्कॅन नसल्याने रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चाचणी करावी लागत होती. सेंट जॉर्जला सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करुन द्यावी, यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार गेल्या वर्षी सरकारने ७ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. त्यातूनच हॉस्पिटलने सिटी स्कॅन मशीन खरेदी केली.

यापूर्वी रुग्णांना सिटी स्कॅनसाठी जे. जे., जी. टी. किंवा खासगी रुग्णालयात पाठवलं जातं होतं. पण, आता तसं होणार नाही. काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा लांबली. शिवाय आम्हाला सिटी स्कॅन मशीनसाठी हवा असलेला टेक्निशियन उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे या सेवेला थोडा विलंब झाला. मात्र आता ही सेवा कायमस्वरुपी सुरू झाली आहे
– डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज

राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येतात

दररोज ५०० हून अधिक लोकं या हॉस्पिटलमध्ये बाहृयरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. यातील अपघाती आणि मेंदूचा विकार असलेल्या रुग्णांचे सिटी स्कॅन करावे लागते. मात्र त्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा यापूर्वी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसल्याचेही डॉ. मधुकर गायकवाड यांनी नमूद केले.

First Published on: June 22, 2018 2:32 PM
Exit mobile version