अखेर ज्यूट बॅगचा प्रस्ताव एकमताने मंजूर

अखेर ज्यूट बॅगचा प्रस्ताव एकमताने मंजूर

'विशेष प्रकल्प निधी' उभारण्यास काँग्रेस, भाजपचा विरोध ; सेना एकाकी पडणार

मुंबईतील भायखळा येथील प्रभाग क्रमांक २०९ चे नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभागात ‘ज्यूट बॅग’ वाटप करण्याबाबतच्या प्रस्तावाला आज अखेर स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे आता प्रभाग २०९ मधील नागरिकांना पर्यावरणाला घातक प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून ‘ज्यूट बॅग’ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वास्तविक यशवंत जाधव यांनी पालिका नियमांप्रमाणे प्लॅस्टिक पिशव्यांना आळा घालण्यासाठी प्रभागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या ‘ज्यूट बॅग’ वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी, यशवंत जाधव हे जास्त निधीचा वापर करीत असल्याचा ठपका ठेवत ज्यूट बॅग खरेदी प्रकरणी ओरड सुरू केली होती. तर दुसरीकडे पालिका आयुक्तांनीही ‘ज्यूट बॅग’बाबतची फाईल अडवली होती. त्यामुळे यशवंत जाधव यांनी, ज्यूट बॅग खरेदीबाबतची प्रक्रिया नियमाने होणार असताना त्याबाबतची फाईल का अडविण्यात आली, असा सवाल करीत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मात्र काही दिवसातच आयुक्तांच्या भूमिकेत अचानक बदल झाला. त्यामुळे आज स्थायी समितीच्या बैठकीत ‘ज्यूट बॅग’ खरेदीसंदर्भातील प्रस्ताव मंजुरीला आला. यावेळी, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी ‘ज्यूट बॅग’ संदर्भातील प्रस्तावाला विरोध केला नाही मात्र ज्यूट बॅगसंदर्भातील व अन्य काही प्रस्ताव हे उशिराने सादर करण्यात आल्याने पुढील बैठकीत चर्चेला घेण्यात यावेत, अशी विनंती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना केली.
त्यानंतर अध्यक्षांनी ज्यूट बॅग संदर्भातील प्रस्ताव महत्वाचा असल्याचे सांगत मंजुरीला टाकला असता त्यास भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटनेते, सदस्य यांनी एकमताने मंजुरी दिली. त्यामुळे आता सुंटेवाचून खोकला गेला.


हेही वाचा- मुंबई होणार ट्रॅफिक जाम मुक्त, पालिका बांधणार सहा नवे पुल

 

First Published on: March 10, 2021 7:24 PM
Exit mobile version