मनपा शाळांच्या फायर ऑडिटबाबत माहिती देण्यास अग्निशमन दल असमर्थ

मनपा शाळांच्या फायर ऑडिटबाबत माहिती देण्यास अग्निशमन दल असमर्थ

मुंबई महानगर पालिका शाळा

मुंबईतील महानगर पालिका शाळांच्या फायर ऑडिटबाबत संपूर्ण माहिती देण्यास मुंबई अग्नीशमन दलाने असमर्थता दर्शविली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसापासून आगीच्या घटनेत वाढ होत असताना देखील मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मनपा शाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतींची फायर ऑडिटची माहिती मागवली होती. मात्र अग्निशमन दलाने सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याचे समोर आले आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ

शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे मनपा शाळांच्या फायर ऑडिट केलेल्या इमारतींची आणि फायर ऑडिट न झालेल्या इमारतींची यादी मागवली होती. यावर अग्निशमन दलाकडून उत्तर देताना मुंबई अग्निशमन दलाचा अभिलेख हा इमारतीच्या सी.एस. क्रमांक आणि विभागानुसार परिरक्षित केला जात असल्याचे सांगण्यात आले. तर उलट मनपा शाळांचा सी.एस. क्रमांक आरटीआय कार्यकर्ते शकील यांना विचारण्यात आला आहे. सी. एस क्रमांक दिल्यानंतर संबंधित माहिती पुरविणे शक्य होईल असं उत्तर अग्निशमन दलाकडून देण्यात आले.

“मुंबई महानगर पालिका नागरिकांना फायर सेफ्टीसाठी इमारतीचे ऑडिकरण्याचे आवाहन करत असते. मात्र बीएमसीच्या स्वत:च्या शाळेत फायर सेफ्टी ऑडिट झाले नाहीत. मनपा शाळांच्या ऑडिटची जबाबदारी अग्निशमन दलाची आहे. मुंबईमध्ये ४३२ इमारतीमध्ये महानगरपालिकेच्या शाळा आहे. जर या ठिकाणी आग लागली तर मोठी घटना होऊ शकते. त्यामुळे अग्निशमन दलाने याकडे लक्ष देत फायर ऑडिट करावे.” – शकील अहमद शेख, आरटीआय कार्यकर्ते

अग्निशमन दलाचे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष

मुंबईतील ३४ अग्निशमन केंद्राच्या हद्दीतील नामनिर्देशित अधिकारी यांना इमारतींची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. असे असताना देखील फायर ऑडिट सारखी महत्वाची माहिती अग्निशमन दल का देत नाही? असा प्रश्न आता विचारला जात आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाला मनपा शाळा इमरतीचा सी.एस. क्रमांक माहित नाही? हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. मुंबईत जेव्हा आगीची घटना घडते तेव्हा अग्निशमन दलाने फायर ऑडिटकडे केलेले दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येते.

First Published on: June 22, 2018 1:27 PM
Exit mobile version