दादरच्या फुलमार्केटमध्ये गोळीबार, एक ठार

दादरच्या फुलमार्केटमध्ये गोळीबार, एक ठार

हत्या करण्यात आलेले मनोज मौर्या

मुंबईतील वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या दादरच्या फुल मार्केटमध्ये आज सकाळी गोळीबार झाला. सकाळी ७:३० च्या सुमारास मनोज मौर्या (३५) या इसमाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. सूत्रांनुसार, दुचाकीवरुन आलेल्या मारेकऱ्यांनी मौर्या यांच्यावर पाठीमागून गोळी झाडली ज्यामुळे मौर्या जागीच ठार झाले. दादरच्या फुल मार्केट परिसरात सकाळच्यावेळी खरेदीसाठी नेहमीच वर्दळ असते. याशिवाय हा परिसर दादर रेल्वे स्थानकापासून जवळ असल्यामुळे रेल्वे प्रवाशांचीही याठिकाणी गर्दी असते. दरम्यान दादर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, मोर्या यांचे शव केईएम रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. दादर सारख्या गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी महादेव मोरे उपस्थित होते. गोळी झाडल्याचा आवाज ऐकू येताच ते धावत तिथे पोहचले. मात्र, तोपर्यंत मारेकरी निघून गेले होते आणि मौर्या जमिनीवर पडले होते. मनोज मौर्या यांच्या मानेतून गोळी आरपार गेल्याचे मोरे यांनी सांगितले. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन CCTV फुटेज मिळवले असून, या हत्येमध्ये दोनपेक्षा अधिक आरोपींचा समावेश असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मृत मनोज मौर्या यांच्या मुलाच्या हातात, त्यांचा पत्नीसोबतचा फोटो

मृत मनोज मौर्या यांच्या पश्चात त्यांची पत्नी, सहा वर्षांचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे. गेली अनेक वर्षं मनोज दादर फुलमार्केट परिसरात वजन काटा पुरवण्याचे काम करत होते. मयत मनोज यांचा भाऊ आणि पत्नी यांच्या सांगण्यानुसार मनोज हा अतिशय शांत स्वभावाचा असल्याने त्याचे कोणाशीही वैर नव्हते. दरम्यान दादर पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, पूढील तपास सुरू असल्याचे रिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी सांगितले आहे.

First Published on: October 12, 2018 12:08 PM
Exit mobile version