आधी भाजपला घालवू; मग पंतप्रधान ठरवू – शरद पवार

आधी भाजपला घालवू; मग पंतप्रधान ठरवू – शरद पवार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला संबोधित करताना शरद पवार

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, आज यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. “आधी भाजपाला घालवू त्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण? हे ठरवू”, असा कानमंत्र शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना मार्गदर्शन करताना दिला.

ज्याचे खासदार जास्त त्याचा पंतप्रधान

भाजपविरोधात आता वातावरण तयार झाले असून, आता सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षांचा येत्या निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल? असे विचारले जात आहे. मात्र काँग्रेसनेही सांगितले आहे की, आमचा पंतप्रधान पदावर दावा नाही, त्यामुळे ज्याचे खासदार जास्त त्याचा पंतप्रधान असेल. हे आधीच ठरल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच जे बदल करण्यासाठी तयार आहेत, त्यांना मी सहकार्य करणार असे सांगत इतरांनीही हा समजूतदारपणा दाखवावा, असे देखील पवार यावेळी म्हणाले. यासोबत जे भाजप बरोबर जाणार नाहीत त्यांनाही घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच ज्या राज्यात भाजपसोडून दुसरा एखादा पक्ष नंबर एकला आहे, त्यांना इतर पक्षांनी साथ द्यावी, असे देखील आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

अतिरेकी संघटनांवर बंदी हवीच

एखादे संघटन जर चुकीच्या मार्गावर जाऊन काम करत असेल तर त्याविरोधात आपण बोलायला हवं. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुरोगामी विचारवंताच्या हत्या झाल्या त्या पाहता अशा संघटनांचा हेतू ठिक दिसत नाही. त्यामुळे अशा अतिरेकी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी आपण केली पाहीजे.

First Published on: August 27, 2018 4:07 PM
Exit mobile version