नेपियन्सी रोड भूखंडावर ४ कंपन्यांच्या उड्या

नेपियन्सी रोड भूखंडावर ४ कंपन्यांच्या उड्या

मुंबईतील सर्वात मोक्याची जागा असलेल्या नेपियन्सी रोडच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागेसाठी चार बड्या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. प्रियदर्शनी पार्क नजीकच्या या सोन्याच्या जागेसाठी ७०० कोटी रूपयांपेक्षा मोठी बोली लागणार हे आता चार बड्या कंपन्यांच्या सहभागामुळे निश्चित आहे. आगामी ६० वर्षांसाठी ही जागा भाडेपट्ट्याने निविदा प्रक्रियेत जिंकणार्‍या कंपनीस देण्यात येणार आहे.

एमएसआरडीसीचा नेपियन्सी रोड या ठिकाणी एकूण १.५४ एकरचा (६७ हजार चौरस फूट)भूखंड आहे. काही दिवसांपूर्वी या जागेसाठी एमएसआरडीसीने निविदा प्रक्रिया सुरू केली. तसेच या जागेचा वापर हा निवासी तसेच वाणिज्यिक वापरासाठी व्हावा यासाठी एमएमआरडीसीने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडेही पत्र व्यवहारही सुरू केला होता. या निविदा प्रक्रियेला मिळालेल्या प्रतिसादामध्ये चार कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये कल्पतरू लिमिटेड, के रहेजा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, रोडवेज सोल्यूशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि सेनटेक रिएलिटी लिमिटेड या कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.

या निविदा प्रक्रियेसाठी सहभागी कंपन्यांकडून काही कागदपत्रांची पूर्तता करणे अपेक्षित होते. गेल्याच आठवड्याच्या अखेरीस ही कागदपत्रांची निविदा पूर्ण करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. निविदा प्रक्रियेत सहभागी कंपन्यांसोबत निविदा पूर्व बैठक आगामी दिवसात घेण्यात येईल. येत्या पंधरवड्यात या निविदा प्रक्रियेसाठीची बैठक घेण्यात येणार असल्याचे कळते. पण निविदा प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी नवीन वर्ष उजाडेल अशीच सध्या स्थिती आहे.

निविदा प्रक्रियेसाठीची बैठक तसेच निविदा प्रक्रियेतील पुढचे टप्पे पाहता आता जानेवारी महिन्यातच यासाठीच्या कंपनीची निवड होईल असे चित्र आहे. आतापर्यंत एमएसआरडीसीच्या मालकीचा हा भूखंड महसूल विभागाच्या ताब्यात होता. पण एमएसआरडीसीने या भूखंडाची मागणी केल्याने हा भूखंड महामंडळाला महसूल विभागाकडून परत करण्यात आला आहे. या संपूर्ण भुखंडासाठी लागणार्‍या बोलीच्या रकमेचा वापर हा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासाठी करण्यात येणार आहे. आगामी ६० वर्षांसाठी हा भूखंड भाडेपट्ट्यानुसार देण्यात येईल.

विकास आराखड्याचे आव्हान

महापालिकेच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या २०३४ या विकास आराखड्यात सध्याच्या एमएसआरडीसीची जागा हा प्रियदर्शनी पार्कच्या सीमेचा भाग असल्याचे दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे डीपीमध्ये सुस्पष्टता येणे गरजेचे आहे. नगर विकास विभागाकडून जागेच्या वापरासाठीचे नोटीफिकेशनही तितकेच महत्वाचे मानले जात आहे.

First Published on: December 3, 2019 5:00 AM
Exit mobile version